मालेगाव : मालेगावच्या राजकीय वर्तुळातून सर्वांच्या भुवया उंचावणारी घटना समोर आली आहे. देशात व राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जाणारे तसेच ज्या दोन पक्षांमध्ये विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे, ते भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मालेगाव महापालिकेत चक्क गळ्यात गळे घालत एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन महापालिकेत स्वतंत्र गट स्थापन केला असून, शुक्रवारी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे अधिकृतपणे गट नोंदणीची प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे.
मालेगाव महानगरपालिकेच्या राजकारणात सत्ता समीकरणे जुळवण्यासाठी यापूर्वी अनपेक्षित युती पाहायला मिळाल्या होत्या. मात्र, काँग्रेस आणि भाजप या दोन परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येऊन गट नोंदणी करत यावेळी नवी चूल मांडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ’भारतीय विकास आघाडी’ या नावाने हा गट स्थापन करण्यात आला असून काँग्रेसचे तीन व भाजपचे दोन अशा पाच सदस्यांनी ही गट नोंदणी केली आहे.
महापालिकेत एकूण ८४ जागा आहेत.या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले नसले तरी इस्लाम पक्षाला सर्वाधिक ३५ जागा मिळाल्या आहेत. त्या खालोखाल ‘एमआयएम’ ला २१ व शिवसेना शिंदे गटाला १८ जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पार्टी, काँग्रेस व भाजपाला अनुक्रमे ५,३ व २ जागा मिळाल्या आहेत. इस्लाम व समाजवादी पार्टीने सेक्युलर फ्रंट नावाची आघाडी करून ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे या आघाडीचे संख्याबळ ४० झाले आहे. या आघाडीला बहुमतासाठी आणखी तीन सदस्यांची गरज असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्या दृष्टीने या आघाडीतर्फे जुळवाजुळव सुरू होती.
काँग्रेसचे महानगरप्रमुख एजाज बेग यांनी सेक्युलर फ्रंट या आघाडीला पाठिंबा दर्शविण्याचे सुतोवाच सुरुवातीलाच केले होते. त्यामुळे या आघाडीला बहुमताचा ४३ आकडा गाठणे शक्य होईल,असा रागरंग दिसत होता. मात्र पडद्याआड आणखी काही घडामोडी घडत होत्या. एमआयएम व शिवसेना शिंदे गटाने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांचे संख्याबळ ३९ होते.
एमआयएम व शिंदे गटाच्या संभाव्य युतीला काँग्रेसने पाठिंबा दिल्यास हे संख्याबळ ४२ पर्यंत जाऊ शकते. अशा स्थितीत भाजपच्या दोन सदस्यांनी पाठिंबा दिला किंवा तटस्थ राहण्याची भूमिका घेतली तर या युतीला सत्तेचे गणित जुळविणे शक्य होऊ शकते, असे आडाखे बांधले जात होते. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तीन सदस्यांनी सेक्युलर फ्रंटला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे,असे काँग्रेसचे महानगर प्रमुख एजाज बेग यांनी गुरुवारी जाहीर केले. त्यामुळे पारडे जड झाल्याने सेक्युलर फ्रंटच्या वर्तुळात उत्साह संचारला आहे.
एजाज बेग यांनी सेक्युलर फ्रंट या आघाडीला पाठिंबा जाहीर केलाच पण भाजपचे दोन व काँग्रेसचे तीन असे पाच सदस्य एकत्र येऊन महापालिकेत स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची आणि हा गट इस्लाम पक्ष अर्थात सेक्युलर फ्रंट या आघाडीला पाठिंबा देणार असल्यामुळे या आघाडीचे बहुमत ४५ पर्यंत जाणार असल्याची माहिती देखील दिली.
काँग्रेससोबत भाजप देखील इस्लाम पक्षाला पाठिंबा देणार असल्याच्या या माहितीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खरंच असे घडेल किंवा नाही, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे काँग्रेस व भाजप मिळून स्थापन झालेल्या गटाची नोंदणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे एजाज बेग हे या गटाचे नेते असून भाजपचे मदन गायकवाड हे उपनेते आहेत.
पक्षातील वरिष्ठांच्या परवानगीने गट स्थापन करण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याचे मदन गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष महापालिकेत एकत्र आल्याने राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र राहत नाही, याची प्रचिती मालेगावात पुन्हा एकदा आली आहे.

