मालेगाव : पोलिसांना मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सटाणा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष महेश देवरे यांच्यासह सहा शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याचा मालेगाव न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाने या सर्व सात जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल सहा वर्षांनंतर लागलेल्या या निकालाकडे संपूर्ण बागलाण तालुक्याचे लक्ष लागून होते.
८ डिसेंबर २०१९ रोजी बागलाण तालुक्यातील पारनेर येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. ही मतदान प्रक्रिया सुरू असताना ४० ते ५० लोकांचा जमाव जमला होता. मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या कक्षेत येऊन जमावाकडून मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण होईल, असा संशय आल्याने पोलिसांनी जमावाला मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मतदान केंद्राच्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, उपनिरीक्षक गोरखनाथ पाटील व पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील यांना मारहाण केली, त्यांचे गणवेश फाडले, बक्कल तोडले, हात पिरगळले असा आरोप सटाणा नगर परिषदेचे तत्कालीन उपनगराध्यक्ष महेश देवरे व अन्य ६ जणांवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम ३५३, ३३२, १४३,१४७,२४९ व ५०६ सह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी मालेगाव येथील जिल्हा न्यायाधीश एस.डी.हरणे यांच्या न्यायालयात पूर्ण झाली.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे फिर्यादी,जखमी पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी शशिकांत शिंदे आदींच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. आरोपींच्या वतीने ॲड. सुधीर अक्कर यांनी युक्तिवाद केला. कथित घटनेच्या वेळी घटनास्थळावरून एकाही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती, नंतर अटक केल्यावर आरोपींची रीतसर ओळख परेड घेण्यात आली नाही,साक्षीदारांनी न्यायालयात सांगितलेली आरोपींची नावे आणि तपासातील नावे यात मोठी तफावत असल्याचा मुद्दा अक्कर यांनी मांडला. तसेच राजकीय द्वेषातून आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला,असा युक्तिवाद त्यांनी केला.
सबळ पुराव्यांचा अभाव
या खटल्याच्या न्यायालयीन सुनावणीत पोलिसांना मारहाण झाली किंवा सरकारी कामात अडथळा निर्माण झाला, याचे ठोस पुरावे सरकारी पक्ष सादर करू शकला नाही. पुराव्यांचा अभाव आणि विसंगती लक्षात घेता, न्यायालयाने महेश देवरे, पुंडलिक देवरे, प्रसाद देवरे, सचिन देवरे, संजय देवरे, चंद्रकांत देवरे व शरद देवरे या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात ॲड. सुधीर अक्कर यांना ॲड. लक्ष्मीकांत सुरसे, ॲड.कमलेश पगारे, ॲड.शुभम पवार व ॲड.संतोष अहिरे यांनी सहकार्य केले.

