मालेगाव: जत्रेत अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने तरुणाची चाकूने भोसकून हत्या आणि चारित्र्याच्या संशयातून पत्नीला अमानुष मारहाण करून तिचा खून, अशा दोन वेगवेगळ्या हत्याप्रकरणांत मालेगाव न्यायालयाने कठोर निकाल दिले आहेत. एका प्रकरणात मुख्य आरोपीला जन्मठेप, तर त्याच्या साथीदाराला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. दुसऱ्या प्रकरणात पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे.

छेडछाडीचा जाब विचारला म्हणून..

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील प्रसिद्ध जैतोबा महाराज जत्रेत ९ऑक्टोबर २०२२ रोजी निष्पाप तरुणाच्या हत्येची गंभीर व खळबळजनक घटना घडली होती. पारोळा तालुक्यातील मोहाडी दहिगाव येथील ऋषिकेश भिल,अर्जुन ठाकरे (वय १९) व त्यांचे नातेवाईक नवस फेडण्यासाठी जत्रेत आले होते. यावेळी पाळण्यात बसलेल्या एका अल्पवयीन मुलीचा गोकुळ श्रावण अहिरे याने विनयभंग केला होता. मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी संशयितास जाब विचारताच त्याचा साथीदार गौरव दादाभाई वडप (रा. चितोड, जि. धुळे) याने पायातील बुटात लपवलेला चाकू काढून अर्जुनवर वार केले. चाकूचा वर्मी घाव लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तेव्हा अर्जुनला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उप अधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांनी याप्रकरणी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यावर शनिवारी निकाल देण्यात आला.

या खटल्यात सरकारी वकील संजय सोनवणे यांनी १६ साक्षीदार तपासले. विशेष पोक्सो न्यायालयाचे अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी गौरव वडप याला जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, तर गोकुळ अहिरे याला तीन वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची ३५ हजार रुपये रक्कम मृत अर्जुनच्या वडिलांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

दारूच्या नशेत पत्नीची हत्या

दुसरी घटना ११ सप्टेंबर २०२१ रोजी मनमाड येथील रेल्वे क्वार्टर परिसरात घडली होती. रमेश दशरथ जाधव (वय ३५) हा दारूच्या नशेत वारंवार पत्नी फुलाबाई (वय ३२) हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. घटनेच्या दिवशीही दारू पिऊन त्याने पत्नीसोबत वाद घातला. त्यानंतर कमरेच्या पट्टयाने आणि लाकडी काठीने तिला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता तिचे डोके फरशीवर आपटले. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने फुलाबाई यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मनमाड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. उपनिरीक्षक वैभव महांगिरे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी वकील ॲड. अशोक पगारे यांनी ८ साक्षीदार तपासून सरकार पक्षाची बाजू मांडली. अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. भोसले यांनी रमेश जाधव याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.