मालेगाव: मालेगाव पोलीस परिमंडळात गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना गोवंश जनावरांची वाहतूक व कत्तल रोखण्यास उल्लेखनीय यश आले आहे. या कालावधीत जवळपास हजारावर गोवंश जनावरांचा जीव वाचविण्यात यश आले असून या संदर्भात १५५ प्रकरणांमधील २५७ जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मालेगावचे अप्पर पोलीस अधिक्षक सूरज गुंजाळ यांनी ही माहिती दिली.

​राज्यात गोवंश हत्त्येला कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अनेक गोतस्कर अवैध कत्तलीच्या हेतूने गोवंश जनावरांची वाहतूक करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुसार मालेगाव पोलिसांकडून व्यापक प्रमाणात मोहिम राबवली जात आहे.या मोहिमेचा भाग म्हणून गेल्या पाच महिन्यात जवळपास एक हजार जनावरांची कसायांच्या ताब्यातून सुटका करण्यात आली. तसेच अशा कारवायांदरम्यान जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारी ११० वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

तालुका पोलीस ठाण्यातंर्गत सर्वाधिक गुन्हे

​या मोहिमेत सर्वाधिक ३७ गुन्हे मालेगाव तालुका पोलीस ठाण्यातंतर्गत नोंदविण्यात आले आहेत. तालुका पोलिसांनी कत्तलीसाठी जाणारे २३७ गोवंश जनावरे जप्त करत ४८ जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांत वापरण्यात आलेली ३७ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. ​तर,मालेगाव शहर व उपविभागात करण्यात आलेल्या कारवाईत ७१ गोतस्करांवर गुन्हे दाखल करून ३०१ गोवंश जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे. यात जनावरांची अवैध वाहतूक करणारी २४ वाहने हस्तगत करण्यात आली असून, ९५ सराईतांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या विशेष पोलीस पथकासह परिमंडळातील उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्दार्थ बारवाल, दर्शन दुग्गड, तसेच शहर, किल्ला, आयेशानगर, आझादनगर, पवारवाडी, तालुका, कॅम्प आणि छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व पोलीस अंमलदारांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कडक नाकाबंदी

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात गोवंश जनावरांची अवैध कत्तल रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली गेली. शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलीस पथकाचा अहोरात्र पहारा ठेवण्यात आला. तसेच वेगवेगळ्या दहा ठिकाणी तपासणी नाके उभारून संशयास्पद वाहनांची कसून झडती घेण्यात आली. याशिवाय शहरात विविध ठिकाणी छापे टाकून कत्तलीच्या हेतूने डांबून ठेवण्यात आलेल्या गोवंश जनावरांची पोलिसांनी सुटका करत त्यांना संगोपनासाठी गोशाळेकडे सुपूर्द केले. दरम्यान,अवैध व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या घटकांविरूध्द मालेगाव पोलीस प्रशासनाकडून यापुढेही अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी दिला आहे.