​मालेगाव: जिल्हा ग्रामीण पोलीस दलाने सराईत आणि फरार गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अनेक गुन्ह्यांत हवा असलेला सराईत गुन्हेगार अकबर खान हबीब खान उर्फ अकबर चोरवा याला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

​नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हेगार, तडीपार, फरार आरोपी आणि हिस्ट्रीशीटरवर यांच्या विरोधात सक्त तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने मालेगाव शहर परिसरात गुन्हेगारांची शोध मोहीम आणि रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी सुरू केली आहे.

​या शोध मोहिमेदरम्यान जिल्हा अभिलेखावरील विविध गुन्ह्यांत ‘वॉन्टेड’ असलेला कुख्यात गुन्हेगार अकबर चोरवा हा नवीन बसस्थानक परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने या परिसरात सापळा रचला. संशयित आरोपी अकबर खान हबीब खान (वय ४०, रा. सर्व्हे नं. १११, प्लॉट नं. २९२, किस्मत सायजिंग,मालेगाव) हा परिसरात येताच पोलिसांनी त्याला घेराव घालून शिताफीने ताब्यात घेतले.

​पोलिसांनी अकबरला विश्वासात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने मालेगाव शहरासह शेजारील जिल्ह्यांतही गुन्हे केल्याचे कबूल केले. चोरवा याच्या विरोधात येथील पवारवाडी, मालेगाव शहर, येवला शहर, जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाणे आदी पोलीस ठाण्यांमध्ये याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा आंतरजिल्हा गुन्हेगारीत सहभाग असल्याचे आढळून आल्याने पुढील ​तपासात मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

​अकबर चोरवा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील ‘सराईत’ गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरी, घरफोडी आणि दरोड्यासारखे अनेक मालमत्ताविषयक गुन्हे दाखल आहेत. तो अत्यंत चलाखीने पोलिसांना गुंगारा देत होता. सध्या त्याला पुढील तपासासाठी पवारवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याच्या अटकेमुळे मालेगाव आणि परिसरात झालेल्या अनेक चोऱ्यांचे आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ व साहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार सुभाष चोपडा, दत्ता माळी, आबा पिसाळ, कैलास मानकर, बालाजी कुंटेवाड,हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.