मालेगाव: येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल ‘शिवापंजाब’ जवळ एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ५७ वर्षीय मुख्याध्यापकाचा मृतदेह ७० फूट खोल विहिरीत आढळून आला आहे. प्रथमदर्शनी या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे मालेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
हॉटेल शिवापंजाब जवळील एका शेतातील विहिरीलगत बऱ्याच वेळेपासून ‘होन्डा शाईन’ दुचाकी बेवारस स्थितीत उभी होती. दुचाकी उभी असली तरी चालक आजूबाजूला कुठेच दिसत नसल्याने हॉटेल व्यावसायिकास संशय आला. त्यामुळे या संदर्भात तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकीच्या क्रमांकावरून तपास केला असता, ती गिलाणे येथील शशिकांत अहिरे यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले.
मुख्याध्यापक दोन दिवसांपासून बेपत्ता
दुचाकी मालक शशिकांत अहिरे हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. ते वाके येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सोयगाव नववसाहत भागात त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे.बेपत्ता असलेल्या अहिरे यांचा कुटुंबीयांकडून दोन दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर महामार्गावरील विहिरीजवळ त्यांची दुचाकी सापडल्याने अनर्थ घडल्याचा संशय बळावला. त्यामुळे मालेगाव येथील अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान शकील तैराकी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहीर तब्बल ७० फूट खोल आणि पाण्याने भरलेली होती. जवान शकील तैराकी यांनी सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर शशिकांत अहिरे यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. शवविच्छेदानंतर सोयगाव स्मशानभूमीत अहिरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मृत शशिकांत अहिरे यांच्या पत्नी ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अहिरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे अहिरे यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रथमदर्शनी हा विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रकार दिसत आहे. मात्र,अहिरे यांनी नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, याचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
