मालेगाव: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या त्रिकुटाचा मालेगावात छडा लागला आहे. नाशिक महानगरपालिकेत क्लार्क, शिपाई व सहाय्यक आयुक्त तसेच शासनाच्या अन्य खात्यांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची तब्बल ५३ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगावच्या कृषीनगर भागातील रविराज महेंद्र पाटील (वय ३०) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन बबनराव चिखले, कृष्णा ठाकूर (दोन्ही रा.नाशिक) आणि संदीप परब (रा. मुंबई) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयीतांनी संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. नाशिक महापालिकेत फिर्यादीच्या भावाला क्लार्क आणि पत्नीला सहाय्यक आयुक्त पदावर नोकरी लावून देतो, असे आमिष संशयीतांनी दाखवले. या कामासाठी फिर्यादीकडून त्यांनी एकूण १५ लाख रुपये उकळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
फसवणुकीचा आकडा ५३ लाखांच्या पार
केवळ फिर्यादीच नव्हे, तर त्यांच्या संपर्कातील अन्य बेरोजगारांना देखील या त्रिकुटाने अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले. कोणाला नाशिक महापालिकेत क्लार्क वा शिपाई, तर कोणाला राज्य उत्पादन शुल्क आणि विक्रीकर विभागात वेगवेगळ्या पदांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. काहींना विविध विभागात उपअभियंता आणि शाखा अभियंता अशा पदांवर नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले. त्यापोटी अन्य बेरोजगारांकडून एकूण ३८ लाख ५० हजार रुपये घेण्यात आले. अशाप्रकारे, फिर्यादीचे १५ लाख आणि इतरांचे साडेअडतीस लाख,असा एकूण ५३ लाख ५० हजार रुपयांचा गंडा या त्रिकुटाने घातल्याचे निदर्शनास आले आहे.
पैसे मागताच टाळाटाळ
सांगितल्याप्रमाणे बराच काळ उलटल्यावरही भाऊ व पत्नीला नोकरी मिळू शकली नाही. त्यामुळे रविराज पाटील यांनी पैसे परत मिळावेत म्हणून संशयीतांकडे तगादा सुरू केला. तेव्हा मुख्य संशयीत सचिन चिखले याने आज देतो, उद्या देतो,असे म्हणत वेळ मारून नेली. तसेच नोकरीसाठी कृष्णा ठाकूर व संदीप परब यांना पैसे दिले आहेत. त्यांनी परत केले की,पैसे देतो असेही चिखलेकडून सांगण्यात येत असे. पैसे देऊन तीन वर्षाचा कालावधी उलटल्यावरही नोकरी नाही आणि पैसे देखील परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलीस तपास सुरू
याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का आणि आणखी किती बेरोजगार यात गंडवले गेले,याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान,सरकारी नोकरीसाठी कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे पैसे देऊ नयेत,नोकर भरती ही अधिकृत प्रक्रिया असून, फसव्या आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
