मालेगाव : एकीकडे बिबट्याची दहशत आणि दुसरीकडे रात्रीचा वीजपुरवठा,अशा स्थितीत जीव धोक्यात घालून शेत पिकांना पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. या समस्येकडे वारंवार लक्ष वेधल्यावरही त्यावर तोडगा काढला जात नाही. त्यामुळे जीव टांगणीला लावणारी ही समस्या शेतकऱ्यांनी आणखी किती दिवस झेलायची असा संतप्त सवाल करत अखिल भारतीय मराठा महासंघ आणि दाभाडी परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरण प्रशासनाला धारेवर धरले. दाभाडी उपविभागीय कार्यालयाचे उपअभियंता चव्हाण यांना घेराव घालत मागण्यांचे निवेदन आंदोलकांतर्फे देण्यात आले.
मालेगाव तालुक्यातील दाभाडी पंचक्रोशीत सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शेजारील बागलाण तालुका आणि मालेगावमधील अनेक गावांना दिवसा वीजपुरवठा केला जात असताना, दाभाडी परिसरात मात्र शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागते. रात्रीच्या अंधारात वन्य प्राण्यांकडून हल्ला होण्याचा मोठा धोका असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे आमच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला महावितरण कंपनीला जबाबदार धरण्यात येईल,असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
खंडित वीजपुरवठा ही आणखी डोकेदुखी
केवळ वीजपुरवठ्याची वेळच नाही, तर गावातील पायाभूत सुविधांचाही प्रश्न गंभीर झाला आहे. दाभाडी गावातील वीज वाहक तारा अत्यंत जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. यासंदर्भात आजवर अनेकदा तक्रारी केल्या गेल्या. तसेच यासंदर्भात ग्रामसभेत वारंवार चर्चा होऊन ठराव करण्यात आले. मात्र,तरीदेखील या तारा बदलल्या गेलेल्या नाहीत. तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे सध्याचे ट्रान्सफॉर्मर अपुरे पडत असून, नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर असतानाही तो उपलब्ध करून दिला जात नसल्याने शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यक्षमतेबद्दल संताप व्यक्त केला.वाढत्या लोकसंख्येमुळे वीजेची मागणी वाढत आहे. त्या तुलनेत वीज भार कमी पडत असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत, याकडे आंदोलकांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
आंदोलनाचा इशारा
जर येत्या काही दिवसांत महावितरण कंपनीने या मागण्यांची दखल घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली नाही, तर संपूर्ण दाभाडी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयावर मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस अमोल रामदास निकम, ज्येष्ठ शेतकरी नेते अंबू दादा निकम, कामगार नेते सुरेश पवार, युवा जिल्हाध्यक्ष मंगेश निकम, महासंघाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब निकम यांच्या नेतृत्वाखाली हे करण्यात आले. याप्रसंगी कारभारी निकम, दीपक निकम, माणिक निकम, चिंधा निकम, पंडित देवरे, यश अहिरे, चेतन हिरे, जयेश शिंदे यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
