मालेगाव: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत मालेगाव तालुक्यातील दलित वस्त्यांमध्ये राबवण्यात आलेल्या विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास बच्छाव यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत नाशिकच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
सन २०२१-२२ मध्ये मालेगाव तालुक्यातील विविध दलित वस्त्यांमधील कुटुंबांना गरम पाणी मिळण्यासाठी सोलर वॉटर हीटर आणि शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्रकल्प उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, हा निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी कागदावरच जिरवण्यात आल्याचा आरोप होत आहे. अनेक ठिकाणी प्रकल्प अपूर्ण आहेत, तर काही ठिकाणी ते अस्तित्वातच नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीची गंभीर दखल
या कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि गुणवत्ता तपासणी करण्यात यावी,निविदेतील अटींनुसार कामे पूर्ण झाली आहेत का, मोजमाप पुस्तिका देयके आणि पूर्णत्व प्रमाणपत्रे यांची पडताळणी करावी, वीज व पाणी जोडणीची सत्यता तपासावी आदी मागण्या बच्छाव यांनी केल्या आहेत. या तक्रारीची समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी स्वयंस्पष्ट स्पष्टीकरण मागवले आहे. त्यांच्याकडून हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला जाणार आहे.
कागदोपत्री कामे करून निधी लाटला?
शासनाने दलित बांधवांच्या मूलभूत गरजांसाठी दिलेला निधी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाटला गेला आहे. तसेच केवळ कागदोपत्री कामे दाखवून सार्वजनिक पैशांचा अपहार करण्यात आल्याचे रामदास बच्छाव यांनी तक्रारीत म्हटले आहे. चौकशीतून सत्य बाहेर आले पाहिजे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी देखील बच्छाव यांनी केली आहे.
