​मालेगाव: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणात न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. येथील जलदगती न्यायालयाने आरोपी विजय खैरनार (वय २४, रा. डोंगराळे) याला अपहरण, लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या आरोपांखाली बुधवारी दोषी ठरवले. अप्पर जिल्हा न्यायाधीश के. जी. पालेदार यांनी हा निकाल जाहीर केला असून, आरोपीला नेमकी काय शिक्षा होणार, याचा फैसला येत्या ७ ऑक्टोबरच्या सुनावणीनंतर होणार आहे.

​ काय आहे नेमके प्रकरण?

गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी डोंगराळे गावातून साडेचार वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती आणि आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी जोर धरू लागली होती. ​पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत गावातीलच विजय खैरनार यास बेड्या ठोकल्या. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तीन आठवड्यांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. गेल्या १० महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात सुरू होती.

​ उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद

जनतेचा आक्रोश आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने या खटल्यासाठी प्रख्यात विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून निकम यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. संजय सोनवणे, ॲड. स्नेहा शर्मा-ठाकरे आणि ॲड. हर्षल तिवारी यांनी सहकार्य केले. या खटल्यात सरकारी पक्षाकडून एकूण २४ साक्षीदार तपासण्यात आले. अटक झाल्यापासून आरोपी खैरनार हा कारागृहात असून बुधवारच्या सुनावणीच्या वेळी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते.

आता काय शिक्षा होणार?

निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव न्यायालय परिसरात सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्वतः न्यायालयात हजेरी लावली होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “डोंगराळे येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी होती. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला. आरोपीवरील सर्व गुन्हे सिद्ध झाले असून त्याला फाशीचीच शिक्षा व्हावी, हीच सर्वांची भावना आहे.”