मालेगाव: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणात न्यायालयाने नराधम विजय खैरनार (२४) याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. येथील जलदगती न्यायालयाचे न्यायमूर्ती के. जी. पालदेवार यांनी हा निकाल दिला आहे. हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालय परिसरात मोठी गर्दी जमली होती.
गेल्या ३० सप्टेंबर रोजी न्यायालयाने आरोपी विजय खैरनार याला अपहरण, लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या आरोपांखाली दोषी ठरवले होते. त्यानंतर गेल्या ७ ऑक्टोबरला पार पडलेल्या अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
काय आहे नेमके प्रकरण?
गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी डोंगराळे गावातून साडेचार वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती आणि आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी जोर धरू लागली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत गावातीलच विजय खैरनार यास बेड्या ठोकल्या. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तीन आठवड्यांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. गेल्या ११ महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात सुरू होती.
उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद
जनतेचा आक्रोश आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने या खटल्यासाठी प्रख्यात विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून निकम यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. संजय सोनवणे, ॲड. स्नेहा शर्मा-ठाकरे आणि ॲड. हर्षल तिवारी यांनी सहकार्य केले. या खटल्यात सरकारी पक्षाकडून एकूण २४ साक्षीदार तपासण्यात आले. अटक झाल्यापासून आरोपी खैरनार हा कारागृहात असून लोकांचा आक्रोश बघता प्रत्येक सुनावणीच्या वेळी तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहिला होता. शुक्रवारी खटल्याच्या अंतिम निकालाच्या वेळी देखील त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच न्यायालयात हजर करण्यात आले होते. लैंगिक अत्याचार व हत्येप्रकरणी फाशी तसेच अपहरण आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रत्येकी ७ वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने आरोपीला सुनावली.
कडक पोलीस बंदोबस्त
निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव न्यायालय परिसरात सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे हा निकाल जाहीर झाला,तेव्हा न्यायालयात हजर होते.
