मालेगाव: शहरात खळबळ उडवून देणाऱ्या सोयगाव येथील दुहेरी खून प्रकरणातील संशयीतांचा छडा लावण्यात मालेगाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. पैशांच्या वादातून दोन सख्ख्या भावांची हत्या करून उत्तर प्रदेशात पळून गेलेल्या दोघांना पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.
गेल्या ८ एप्रिल रोजी मालेगावच्या सोयगाव भागातील आयोध्यानगरात ही थरारक घटना घडली होती. मूळचे गोरखपूरचे असलेले निखिल भोला सहाणी (१८) आणि अनिश उर्फ गालू भोला सहाणी (३४) या दोन भावांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले होते. या हल्ल्यात एका भावाचा जागीच मृत्यू झाला होता तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या दुहेरी हत्याकांडामुळे सोयगाव परिसर हादरुन गेला होता. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातून फिल्मी स्टाईलने अटक
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयीत मालेगाव आणि मनमाड परिसरातून फरार होऊन उत्तर प्रदेशात पळाल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ तिकडे रवाना करण्यात आले. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील डुमरियागंज तालुक्यात पोलिसांनी सलग दोन दिवस पाळत ठेवली. अखेर हल्लोर शिवारातून रजा कैसर अब्बास (१९) आणि ऑन मंजु अब्बास उर्फ ऑन भाई (२०) या दोघांना पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.
आर्थिक वादाचे कारण
पकडण्यात आलेल्या दोघा संशयीतांनी चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला आहे. पैशांच्या वादातूनच आम्ही दोघा भावांवर वार केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी या दोन्ही संशयीतांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल व दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, छावणीचे निरीक्षक दिपक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, अंमलदार शाम पवार, शरद मोगल, योगेश कोळी, विशाल गोसावी, सचिन वराडे, नरेंद्र कोळी, संदीप राठोड,हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम व नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे.
‘चाचा बचाव’ म्हणून आरडाओरड
अनिश सहाणी,त्याचा भाऊ निखिल तसेच त्यांचे दोन मित्र मोहम्मद रजा व ऑन अब्बास हे चौघे अयोध्या नगरमध्ये भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते. उत्तर प्रदेशातून पेंटिंग कामासाठी हे चौघे मालेगाव येथे आले होते. ८ एप्रिलच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास त्यांच्या खोलीतून ‘चाचा बचाव’ म्हणून जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. तेव्हा बाजूच्या खोलीत वास्तव्यास असलेले अनिश याचे काका दुर्गेश सहाणी यांनी दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता, खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळाने अनिश याने दुर्गेश यांचा दरवाजा उघडला. त्यावेळी अनिश गंभीर जखमी अवस्थेत होता व त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू होता. नंतर काही क्षणात तो जमिनीवर कोसळला. यानंतर दुर्गेश हे पुतण्यांच्या खोलीत गेले असता मोहम्मद रजा व ऑन अब्बास हे दोघे गायब दिसले आणि निखिल हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. दोघांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अनिशला मृत घोषित केले. जखमी निखिलने शुद्धीवर असताना काकांना आरोपींची नावे आणि घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला, मात्र नंतर उपचारादरम्यान त्याचीही प्राणज्योत मालवली.
आर्थिक देवाणघेवाणीतून मोहम्मद रजा याने धारदार लोखंडी हत्याराने अनिशच्या डोक्यावर, पोटावर आणि पाठीवर सपासप वार केले. भावाला वाचवण्यासाठी निखिल धावून गेला असता, दुसरा संशयीत ऑन अब्बास याने निखिलवरही वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले आणि दोघे संशयीत पळून गेले,असा घटनाक्रम निखिल याने सांगितला. त्यानुसार दुर्गेश सहाणी यांनी पोलिसात तक्रार दिली.
