मालेगाव: दुष्काळाच्या झळांनी पिके हातची गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. डोक्यावर कर्जाचा डोंगर, हातात उत्पन्न नाही आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. अशा परिस्थितीत दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत म्हणजे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे. शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा असताना तुटपुंज्या मदतीची घोषणा करून सरकारने अन्नदात्याची क्रूर थट्टा केली आहे, असा संतापही चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

राज्य मंत्रिमंडळाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्याचा निर्णय जाहीर केला. राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. केंद्राच्या मदतीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी तातडीचा दिलासा देण्यासाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. परंतु ही रक्कम अत्यंत तूटपूंजी असल्याचे नमूद करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली आहे. बागलाणच्या माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या दीपिका चव्हाण यांनी देखील या निर्णयाबद्दल तीव्रनापसंती व्यक्त केली आहे. निव्वळ राजकीय घोषणाबाजी बाजूला ठेवून सरकारने शेतकऱ्यांना सन्मानाने जगता येईल,अशी आर्थिक ताकद द्यावी, तरच बळीराजाची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होईल, असेही त्यांनी नमूद केले केले आहे.

सत्ताधाऱ्यांनाच आव्हान..

​वाढती महागाई पाहता तेल, साखर, डाळी आणि गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांनी स्वतः ५ हजार रुपयांत दिवाळी साजरी करून दाखवावी,असे थेट आव्हान चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. सर्वसामान्यांचे बजेट कसे कोलमडले आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव सत्ताधाऱ्यांनी घ्यावा आणि मगच शेतकऱ्यांसाठी मदतीचा आकडा ठरवावा,असे सुचवत शेतकऱ्यांच्या वेदनेची जाणीव नसलेले हे सरकार असंवेदनशीलतेची परिसीमा गाठत आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

​ हेक्टरी लाखाचा खर्च, मदत मात्र नाममात्र!

​शेतीतील मशागत, बियाणे, खते, फवारणी आणि मजुरी असा एका हेक्टरसाठी सरासरी १ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून उभी केलेली पिके डोळ्यांसमोर जळून खाक झाली आहेत. लाखांचे नुकसान झालेले असताना ५ हजार रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांचे अश्रू कसे पुसले जाणार? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. वाढता खर्च आणि सण पाहता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी किमान ५० हजार रुपयांची अग्रीम मदत द्यावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपये थेट नुकसानभरपाई देण्यात यावी, मदत देताना क्षेत्र मर्यादांचे जाचक निकष बाजूला ठेवून सरसकट प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी,अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.