मालेगाव: महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त भागातील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही, मालेगावसह जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून सक्तीने परीक्षा शुल्क वसूल करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याविरोधात येथील साथी प्रतिष्ठानने आक्रमक भूमिका घेतली आहे.
खरीप हंगाम २०२६ मध्ये राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ३०२ तालुक्यांमध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील मालेगावसह १३ तालुक्यांचा समावेश आहे. या अनुषंगाने संबंधित तालुक्यांसाठी विविध सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून दुष्काळग्रस्त भागातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरणे सुरू आहे. त्यात अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून आगामी परीक्षांसाठी शुल्क आकारत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शासनाचा निर्णय कागदावर आहे की काय,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह तक्रार
येथील साथी प्रतिष्ठानच्या वतीने यासंदर्भात मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रश्नी लक्ष वेधण्यात आले आहे. दुष्काळ जाहीर करणारा २५ सप्टेंबरचा मूळ शासन निर्णय,महाविद्यालयांनी नियमबाह्य पद्धतीने वसूल केलेल्या परीक्षा शुल्काच्या पावत्या आणि परीक्षा शुल्क वसुलीला विरोध करणाऱ्या तब्बल १५६ विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र प्रतिष्ठानने या निवेदनासोबत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. सध्याच्या भीषण दुष्काळामुळे आधीच शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य पालकांचे कंबरडे मोडले आहे. अशा बिकट परिस्थितीत महाविद्यालयांची ही सक्ती विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय करणारी आहे. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने आदेश काढून परीक्षा शुल्क वसुली थांबवावी आणि ज्या विद्यार्थ्यांकडून आधीच शुल्क घेतले आहे, ते तत्काळ त्यांच्या खात्यावर वर्ग करावे,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या प्रसंगी योगेश कळमकर,रिया मगरे, सचिन मार्कंड, राजरत्न जगताप, रोशन लोंढे, अरबाज शेख, शिखा यादव, प्रांजल हिरे, हर्षिता महाले, मनिष व्हडगर, रोशन माळी, वसीम पिंजारी, आतिफ खान, आसिफ शेख, मयुर सूर्यवंशी, सुमीत डामरे आणि गणेश बगाड यांच्यासह विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
