​मालेगाव: मालेगाव शहरातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि अविवाहित एकल महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’चे (२३ जून) औचित्य साधत, महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे दि. २३ जून २०२६ ते २९ जून २०२६ या कालावधीत शहरात ‘एकल महिला नोंदणी विशेष अभियान’ राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २३ जून हा दिवस ‘एकल महिला दिन’ म्हणून साजरा केला जात असून, यादरम्यान मालेगाव महानगरपालिका हद्दीतील एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची अचूक माहिती संकलित केली जाणार आहे. ​या विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच पतीपासून विभक्त राहणाऱ्या एकल महिलांची नोंदणी केली जाईल. नोंदणी झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, आर्थिक सहाय्य, स्वावलंबन उपक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच इतर शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन व सहकार्य महानगरपालिकेमार्फत केले जाणार आहे.

.. अशी करता येईल नोंदणी

महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ​मालेगाव शहरातील पात्र एकल महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाशी आवश्यक कागदपत्रांसह थेट संपर्क साधून आपली नोंदणी करून घ्यावी. तसेच डिजिटल माध्यमांचा वापर करून महिलांना घरबसल्या सहज नोंदणी करता यावी, यासाठी प्रशासनाने एक गुगल फॉर्म लिंक देखील जाहीर केली आहे. इच्छुक महिला https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfYbKGI2fxXn3ry6rMtroVMokS9axBXrg?usp=dialog या अधिकृत लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरू शकतात. शहरातील एकही पात्र एकल महिला शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, हा या अभियानाचा हेतू असल्याचे नमूद करत मालेगाव शहरातील सर्व पात्र भगिनींनी या मोहिमेत सहभागी होऊन आपली नोंदणी मुदतीत पूर्ण करावी,असे आवाहन महापौर नसरीन बानो खालिद शेख व पालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी केले आहे.

नागरिकांकडून सूचना व अभिप्राय

एकल महिला सक्षमीकरण धोरणाची निश्चिती आणि ते प्रभावीपणे राबविण्यासाठी मालेगाव महापालिकेतर्फे नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि अविवाहित एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे धोरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. याअंतर्गत रोजगार व उद्योजकता, महिला सुरक्षा, आरोग्य व शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, सामाजिक संरक्षण, कौशल्य विकास व प्रशिक्षण, कायदे व नियमांमधील आवश्यक सुधारणा, तसेच नाविन्यपूर्ण कल्पना व उपक्रम या प्रमुख विषयांवर नागरिकांनी आपले अभिप्राय २९ जून २०२६ पूर्वी महिला व बालकल्याण विभाग, मालेगाव महानगरपालिका येथे लेखी स्वरूपात, mahilabalvikasmmc@gmail.com या ई-मेलवर किंवा https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf_qjsbLzDUGfKXnT9giHdKBO3CJdE8MGoeAMY9IruquEqQ/viewform?usp=dialog या गुगल फॉर्म लिंकचा वापर करून पाठवावेत,असे आवाहनही महापौर नसरीन शेख व आयुक्त रवींद्र जाधव यांनी केले आहे.