मालेगाव : अमेरिका, इस्रायल–इराण युद्धाच्या छायेत आखाती देशांतील अनेक विमाने रद्द झाल्यामुळे हजारो भारतीय दुबईत अडकून पडले. अशा कठीण परिस्थितीत मालेगावच्या एका उद्योजकाने माणुसकीचे आगळेवेगळे उदाहरण घालून दिले आहे. दुबईस्थित उद्योजक धीरज जैन यांनी आपल्या खासगी फार्म हाऊसचे दरवाजे खुले करून अडकलेल्या भारतीयांसाठी विनामूल्य निवारा,भोजन व अन्य व्यवस्था उपलब्ध करून दिली.

आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गेल्या २८ फेब्रुवारी रोजी दुबई येथील विमान उड्डाणे रद्द झाली. उड्डाण रद्द झालेल्या एका भारतीयाला दुबईच्या हॉटेलमध्ये खोली मिळत नाही,अशी माहिती जैन यांना मिळाली. तेव्हा अडकलेल्या आपल्या लोकांसाठी दुबईत सोय करायला हवी, अशी त्यांची भावना झाली व त्यानुसार ते लागलीच कामाला लागले.

तब्बल ३०० जणांची त्यामुळे मोठी सोय होऊ शकली. युद्धासारख्या या बाका प्रसंगात मायभुमीपासून हजारो मैल दूर अंतरावर जैन यांच्या रूपाने मदत करण्यासाठी पुढे आलेली व्यक्ती जणू ‘देवदूत’ ठरली आहे,अशी भावना दुबईत अडकून पडलेल्या संबंधित भारतीयांची झाली आहे.

सोशल मीडियावर संदेश धाडला अन्..

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुबईत अडकून पडलेल्या भारतीयांची निवास व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येईल,असा संदेश जैन यांनी प्रारंभी सोशल मीडियावरून प्रसारित केला. त्यानंतर अडकलेल्या भारतीयांकडून मदतीसाठी संपर्क साधणे सुरू झाले. या लोकांशी चर्चा केल्यावर अनेक हॉटेल्समध्ये खोल्या उपलब्ध होत नव्हत्या. तसेच अचानक उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे काही लोकांसमोर आर्थिक संकट उभे राहिल्याचे जैन यांच्या निदर्शनास आले. तेव्हा अडकलेल्या भारतीयांसाठी अजमानी येथील आपल्या खासगी फार्महाऊसचे दरवाजे खुले करून जैन यांनी एकाच दिवसात सारी व्यवस्था उभी केली. एवढेच नव्हे तर प्रवाशांना विमानतळ तसेच अडकून पडलेल्या ठिकाणापासून फार्म हाऊसपर्यंत आणण्यासाठी आपली खासगी वाहने त्यांनी धाडली. गेल्या नऊ दिवसात या ठिकाणी भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधील जवळपास ३०० जणांनी या सोयीचा लाभ घेतला. ही संख्या वाढली तरी अडचण नको म्हणून जैन यांनी सुमारे ५०० लोकांसाठी निवास आणि भोजनाचे नियोजन तेथे करून ठेवले होते.

‘कुटुंब रंगलंय सेवा कार्यात’!

​या मदतकार्यात धीरज जैन यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी ममता जैन, १४ वर्षांचा मुलगा जैनम आणि ११ वर्षांची मुलगी जीविका यांनी देखील झोकून दिले आहे. गेली ९ दिवस आपले घर सोडून जैन कुटुंबाने आपला मुक्काम या लोकांसमवेत या फार्महाऊसवर हलवला आहे. या ठिकाणी अडकलेल्या भारतीयांच्या आदरातिथ्यात हे कुटुंब मग्न झाले आहे. या लोकांची अजिबात गैरसोय होऊ नये,याची काळजी ते वाहत आहेत. या फार्म हाऊसमध्ये असलेल्या काही खोल्या तसेच तात्पुरत्या स्वरूपात तंबू उभारून लोकांना राहण्यासाठी सोय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. युद्ध प्रसंगामुळे अडकून पडलेल्या लोकांमध्ये ताणतणाव येऊ म्हणून योगा,खेळ,संगीत,अंताक्षरी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी दररोज केले जाते. पहिल्याच दिवशी ७० भारतीय जैन यांच्या फार्म हाऊसमध्ये दाखल झाले होते. नंतर दिवसागणिक ही संख्या वाढत जाऊन ३०० पर्यंत गेली. आता उड्डाणे सुरू झाल्याने त्यातील काही लोक भारतात परतू लागली आहेत. शनिवारी एकाच दिवशी या ठिकाणी थांबलेले १५० भारतीय मायदेशी परतले. त्या आधीच्या दोन-तीन दिवसात ७५ जण भारतात परतले होते. विमानाचे तिकिटे उपलब्ध होत नसल्याने अजूनही ७५ भारतीय जैन यांच्या फार्म हाऊसमध्ये मुक्कामास आहेत. १५ मार्चपर्यंत उर्वरित सर्व भारतीय मायदेशी परत जातील,अशी आशा जैन यांनी ‘लोकसत्ता’शी मोबाईलवरून बोलताना व्यक्त केली.

​ कोण आहेत धीरज जैन?

​धीरज जैन हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या वडनेर-खाकुर्डी येथील रहिवासी असून व्यवसायानिमित्त दुबईत स्थायिक झाले आहेत. पुण्यात इंजिनियरिंगमधील पदवी घेतल्यानंतर काही काळ त्यांनी युरोपमध्ये नोकरी केली. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी दुबईत स्वतःचा व्यवसाय थाटला. वडनेरचे प्रसिद्ध व्यापारी कांतीलाल जैन यांचे ते चिरंजीव आहेत. ते ‘१ एक्सेल होल्डिंग्स दुबई’ या कंपनीचे चेअरमन असून त्यांचा मुख्य व्यवसाय रिअल इस्टेट डेव्हलपमेंटचा आहे. ‘जैनम जीविका फाउंडेशन’ या बिगर सरकारी संस्थेतर्फे यापूर्वी त्यांनी भारतात विविध सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. आताच्या युद्धजन्य परिस्थितीत आपल्या मातृभूमीतील लोकांच्या मदतीसाठी त्यांनी दाखविलेल्या तत्परतेचे आणि दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.