मालेगाव: ‘ज्या घराण्याने मालेगावातील नगरपालिका व महापालिकेत तब्बल ६० वर्षं प्रतिनिधित्व केले, त्या घराण्यातील ज्या व्यक्तीने शहराचे प्रथम नागरिक म्हणून पद भूषवले, आज त्यालाच मालेगावात ‘बांगलादेशी’ ठरविण्याचा घाट घातला जात आहे का?’असा संतप्त सवाल मालेगावचे माजी नगराध्यक्ष दीपक भोसले यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अलीकडेच केलेल्या एका विधानानंतर उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भोसले यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.प्रसाद हे मंगळवारी स्थायी व महिला-बालकल्याण समिती अध्यक्ष पदांची निवडणूक घेण्यासाठी मालेगाव महापालिकेत आले होते. यानिमित्ताने भोसले यांनी महापालिका प्रवेशद्वाराजवळ काही काळ बसकन मांडली. यावेळी भोसले यांनी हातात फलक उंचावत आपला रोष व्यक्त केला.
प्रकरण नेमके काय ?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावातील जन्म दाखले घोटाळा उघडकीस आणला. यानिमित्ताने जवळपास साडेचार हजार जन्म दाखले रद्द करण्यात आले आहेत. भारतात जन्म झाल्याचा कोणताही पुरावा नसताना बनावट कागदपत्रे सादर करून संबंधित लोकांनी जन्म दाखले प्राप्त केली होते. तसेच हे लोक बांगलादेशी व रोहिंगे घुसखोर असल्याचा आरोप सोमय्या हे सातत्याने करीत आहेत. जन्म दाखले रद्द झालेल्या व्यक्तींमध्ये मुस्लिमांप्रमाणेच काही हिंदू व्यक्तींचा समावेश आहे.
माजी नगराध्यक्ष राहिलेले दीपक भोसले यांचाही जन्म दाखला या प्रक्रियेत रद्द झाला आहे. गेल्या महिन्यात सोमय्या हे मालेगावात आले होते. यावेळी पत्रकारांनी भोसले यांचा देखील जन्मदाखला रद्द झाल्याचे निदर्शनास आणून देत तेही घुसखोर आहेत का, असा थेट प्रश्न सोमय्या यांना विचारला. त्यावर ज्यांच्याकडे भारतात जन्म झाल्याचे काहीच पुरावे नाहीत, त्यांचे जन्म दाखले रद्द झाले असून ते बांगलादेशी,रोहिंग्या अथवा अतिरेकी असू शकतात, असे वादग्रस्त उत्तर सोमय्या यांनी दिले होते.
दुखावलेले भोसले आक्रमक
किरीट सोमय्या यांनी केलेल्या विधानाने दुखावलेल्या दीपक भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेत आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना सवाल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांच्या विचारांवर चालणारे आमचे भोसले घराणे आहे. असे असताना संशय निर्माण केला गेल्याने आमचे घराणे बांगलादेशी किंवा रोहिंगे आहे किंवा काय, ही वस्तुस्थिती लोकांसमोर येण्यासाठी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी,असा आग्रह भोसले यांनी यावेळी धरला. तसेच आपण भारतीय असल्याचा प्रशासनाने पुरावा देऊन आमच्यावरील कलंक पुसावा अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
भोसले घराण्याचा राजकीय वारसा काय?
भोसले यांनी यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांच्या भोसले घराण्याचा गेल्या ६० वर्षांतील राजकीय वारसा काय आहे, याचा उल्लेख केला आहे. स्वतः दीपक भोसले हे १० वर्षे मालेगाव नगरपालिकेत नगरसेवक होते. १९८८ ते १९९१ या काळात त्यांनी मालेगावच्या नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेली आहे.
त्यांचे वडील कै.श्रीराम भोसले व काका कै. लक्ष्मण भोसले हे दोघेही प्रत्येकी दहा वर्षे नगरसेवक होते. भोसले यांच्या पत्नी ॲड.ज्योती भोसले या मालेगाव महापालिकेत २० वर्षे नगरसेवक होत्या. २००५ ते २००७ या कालावधीत मालेगावच्या पहिल्या उपमहापौर म्हणून अडीच वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे.
भोसले यांचे चुलत बंधू राजेंद्र भोसले व अनंत भोसले यांनीही नगरसेवक म्हणून कामकाज केले आहे,या बाबी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. तसेच ‘गेल्या ६३ वर्षांपासून मी मालेगावचा रहिवासी असून,माझा जन्म याच मातीत झाला आहे. तरीही मला आणि माझ्या कुटुंबाला संशयाच्या भोवऱ्यात का उभे केले जात आहे’ असा सवाल भोसले यांनी उपस्थित केला आहे.
