​मालेगाव : मालेगाव शहरासह परिसरात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्याची मोठी कारवाई नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांनी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या संभाजीनगर येथील ‘मास्टरमाइंड’ला मध्यस्थ व साथीदारांसह बेड्या ठोकल्या आहेत. संशयीताच्या ताब्यातून नोटा छापण्यासाठी लागणारे आधुनिक साहित्य, बनावट नोटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​या प्रकरणाची सुरुवात गेल्या २३ जानेवारी २०२६ रोजी झाली. मालेगावच्या सटाणा नाका परिसरातील एचडीएफसी बँकेत महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स कंपनीचा कलेक्शन एजंट गणेश खरे हा भरणा करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने बँकेत ८९ हजारांचा भरणा केला. तेव्हा बँकेचे असिस्टंट मॅनेजर मोहन मुसळे यांना भरणा केलेल्या एकूण रकमेपैकी ५०० रुपयांच्या १०० नोटा (म्हणजे एकूण ५० हजार रुपये) बनावट असल्याचा संशय आला. या प्रकरणी मुसळे यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

​मालेगाव ते संभाजीनगरपर्यंत साखळी

​पोलिसांनी एजंट गणेश खरे यास संशयावरून ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. तेव्हा नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी रायभान जाधव यांचा ट्रॅक्टर कर्जाचा हप्ता भरण्यासाठी अजय राठोड याच्याकडूध ही रक्कम मिळाल्याचे त्याने सांगितले. अजयकडे चौकशी केल्यावर करण राठोड याच्याकडून ही रक्कम मिळाल्याचे त्याने सांगितले. करण याची चौकशी केल्यावर कन्नड येथील बन्सीलाल यादव याने पाचशे रुपयांच्या एक लाख १३ हजाराच्या बनावट नोटा त्याच्याकडे दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तपासाचा धागा पुढे नेला असता, कन्नड येथील रेहान खान व समीर खान यांची नावे पुढे आली. समीर यास या नोटा संभाजीनगर येथील गोल्डन कुरेशी याने दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार समीर शेख, गोल्डन कुरेशी, अजिंक्य जाधव आणि शुभम थोरात या मध्यस्थांची साखळी पोलिसांनी शोधून काढली. या सर्वांच्या चौकशीतून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार संभाजीनगर येथील संतोष केळसकर हा असल्याचे निष्पन्न झाले.

‘ग्राफिक डिझायनर’चे काळे कारनामे

बनावट नोटांच्या या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार संतोष केळसकर याच्यासह त्याच्या सर्व साथीदारांना मालेगावच्या छावणी पोलिसांनी अटक केली आहे. संतोष हा पेशाने ग्राफिक डिझायनर असून त्यानेच या नोटा तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. ​पोलिसांनी संतोष याच्या ‘विनायक ग्राफिक्स’ या दुकानावर छापा टाकला. तेथून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे १ लाख ३६ हजार ७०० रुपयांचे साहित्य जप्त केले. त्यात ​हाय-टेक संगणक आणि कलर प्रिंटर,८५ जीएसएम दर्जाचा पेपर,प्रिंटिंगची शाई,​स्क्रीन प्रिंट, पेन ड्राईव्ह आणि स्केल कटर आदी साहित्याचा त्यात समावेश आहे. ​तपासादरम्यान पोलिसांनी आतापर्यंत ५०० रुपयांच्या एकूण ३८५ बनावट नोटा (सुमारे १ लाख ९२ हजार ५०० रुपये) हस्तगत केल्या आहेत.

यांनी केली ‘ही’ कारवाई फत्ते

​नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई फत्ते केली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस हवालदार गांगुर्डे, सय्यद, नितीन अहिरे, वैभव आहेर, सलमान खाटीक, गोरख ठोंबरे यांचा समावेश होता. या कारवाईमुळे बनावट नोटांचे आंतरजिल्हा रॅकेट मोडीत निघाले असून, यामागे अजून कुणाचा हात आहे,तसेच संशयीतांनी आणखी किती बनावट नोटा चलनात आणल्या आहेत,याचा तपास आता पोलीस करत आहेत.