मालेगाव: शेतमाल आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी २०१८ मध्ये पुकारलेल्या शेतकरी संपादरम्यान दुधाचा टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतल्याबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यातून पाचही आंदोलक शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. सरकारी पक्ष आंदोलकांवरील आरोप सिद्ध करु न शकल्याने येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. पी. परदेशी यांनी हा निकाल दिला.
काय होते नेमके प्रकरण?
‘राष्ट्रीय किसान महासंघ’ या शेतकरी संघटनांच्या संयुक्त मंचाने विविध मागण्यांसाठी १ जून ते १० जून २०१८ या कालावधीत शेतकऱ्यांचा संप करण्यात आला होता. त्याचाच भाग म्हणून शेतकऱ्यांनी गावांतून शहरांमध्ये भाजीपाला, फळे, अन्नधान्य आणि दूध पाठवणे बंद केले होते. शेतमाल, कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा आदी मागण्यांसाठी मालेगाव तालुक्यातही ठिकठिकाणी बंद व रास्ता रोको अशा स्वरूपाची आंदोलने करण्यात आली होती. १ जून रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील देवघट येथे रास्ता रोको आंदोलन सुरू असताना रस्त्यावरून जाणारा दुधाचा टँकर अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतून नुकसान केल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांवर ठेवण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शरद मोगल यांच्या फिर्यादीवरून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयात काय घडले?
या खटल्यात पोलिसांनी बंडू उर्फ प्रवीण पगार, विजयसिंग देसले, गणेश निकम, शरद निकम आणि योगेश जाधव या पाच शेतकऱ्यांवर दोषारोप ठेवले होते. खटल्यादरम्यान फिर्यादी पोलीस हवालदार शरद मोगल यांच्यासह एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. तथापि, संबंधित शेतकऱ्यांनीच रास्ता रोको करून टँकरमधील दूध सांडले, हे सरकारी पक्ष सिद्ध करु शकला नाही. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि साक्षीदारांचे जबाब तपासून न्यायालयाने संशयीत सर्व पाचही शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता केली. आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने ॲड. सुधीर अक्कर व ॲड. साई अक्कर यांनी जोरदार युक्तिवाद करत बाजू मांडली. त्यांना ॲड. लक्ष्मीकांत सुरसे, ॲड. संतोष अहिरे, ॲड. हितेश जैन आणि ॲड. कृष्णा मिश्रा यांनी सहकार्य केले. आठ वर्षांनंतर आलेल्या या निकालामुळे आंदोलक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
