मालेगाव: शेतमालाचे हक्काचे पैसे मागणाऱ्या अन्नदात्यावर भर पावसात अर्धनग्न होऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे. बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांची तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यापारी टोळीला पोलिसांकडूनच अभय दिले जात असल्याचा आरोप करत, बुधवारी संतप्त शेतकऱ्यांनी मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हे आंदोलन केले.
तपास अधिकाऱ्याच्या संशयास्पद भूमिकेमुळे आरोपींना न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळू शकल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहून अप्पर पोलीस अधीक्षकांनी वादग्रस्त पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्याची ग्वाही दिली.
बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील ‘मुक्ताई ट्रेडिंग कंपनी’च्या संचालकांनी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा संशय आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये व्यापारी नारायण सुपडू बागूल, जयेश बागूल, दत्तात्रय बागूल, संदेश बागूल आणि उमेश पाटील यांनी मका व कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शेतमाल खरेदी केला होता. महिनाभरात पैसे देण्याचे आश्वासन देऊनही नंतर मात्र व्यापाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. अखेर सहनशीलता संपलेल्या शेतकऱ्यांनी जून महिन्यात जायखेडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. मका उत्पादक शेतकऱ्यांची १ कोटी ४० लाख तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ७० लाख १० हजार रुपयांची अशी एकूण २ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद
गुन्हा दाखल होऊन महिना उलटला तरी पोलिसांनी ५ पैकी केवळ एकाच संशयीताला अटक केली होती. दरम्यान, संशयीतांनी मालेगाव न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बुधवारी न्यायालयाने चारही संशयीत आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. ही बातमी समजताच शेतकऱ्यांचा संयम सुटला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सागर काळे यांची या प्रकरणातील भूमिका सुरुवातीपासून संशयास्पद आहे तसेच न्यायालयात त्यांनी योग्य बाजू न मांडल्यामुळेच संशयीतांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज मंजूर होऊ शकला,असा आरोप करत शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात मालेगावात अर्धनग्न होत आंदोलन सुरू केले.
अप्पर पोलीस अधीक्षकांचे आश्वासन
शेतकऱ्यांचा वाढता संताप पाहून अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी तातडीने आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांची बाजू ऐकून घेतली. या गंभीर प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या तपास अधिकारी सागर काळे यांची तात्काळ नियंत्रण कक्षात बदली करण्यात येईल, असे आश्वासन गुंजाळ यांनी दिले.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव आणि ‘आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती’चे निखिल पवार यांनी मध्यस्थी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आश्वासन आणि जाधव व पवार यांनी केलेल्या मध्यस्तीनंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. या आंदोलनात चंद्रकांत गवळी, अविनाश मानकर, पितांबर नंदन, संतोष अहिरराव, प्रकाश खैरनार यांच्यासह फसवणूक झालेले अन्य शेतकरी सहभागी झाले होते.
