​मालेगाव : तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे आठवडी बाजारात खाल्लेल्या भेळभत्त्यासोबतच्या दूषित चटणीमुळेच तब्बल १८६ जणांना विषबाधा झाल्याचे सोमवारी समोर आले. याप्रकरणी पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण करून आपला प्राथमिक अहवाल सादर केला असून, त्यामध्ये चटणीच्या सेवनानेच हा त्रास उद्भवल्याचे स्पष्ट अनुमान वर्तवण्यात आले आहे.

नांदगाव बुद्रुक येथे रविवारी (२७ सप्टेंबर) आठवडी बाजार भरला होता. या बाजारात पाटणे येथील एका विक्रेत्याने भेळभत्ता आणि तीन प्रकारच्या चटण्या विक्रीसाठी आणल्या होत्या. हे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर सोमवारी सकाळपासून अनेक ग्रामस्थांना जुलाब, उलटी आणि मळमळीचा तीव्र त्रास सुरू झाला. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, ज्या नागरिकांनी चटणीसह भेळभत्ता खाल्ला त्यांनाच हा त्रास झाला असून, चटणीशिवाय भेळ खाल्लेल्या नागरिकांना कोणताही त्रास झालेला नाही. यावरून भेळभत्त्यासोबतची चटणी दूषित असल्यामुळेच ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

​घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने गावात तात्काळ धाव घेतली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली आणि योग्य उपचारांचे निर्देश दिले. सध्या सामान्य रुग्णालयात १०९, महिला व बाल रुग्णालयात ७१ आणि कॅम्प येथील नागरी आरोग्य केंद्रात ६ अशा एकूण १८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये नांदगाव बुद्रुकसह परिसरातील भोरटे वस्ती, आनंदवाडी, गुंजाळवाडी, वाके आणि सौंदाणे येथील बाधितांचा समावेश आहे.

सुरुवातीला या रुग्णांवर स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आले. त्यांनंतर रुग्ण संख्या वाढत असल्याची बाब समोर आल्यावर आरोग्य यंत्रणा तात्काळ ॲक्शन मोडवर आली. सर्व रुग्णांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालय,महिला व बाल तसेच कॅम्प रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी तालुका पोलिसांनी भत्ता विक्रेता हिला मोरे (रा.पाटणे) याला ताब्यात घेतले असून भत्ता व चटणीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

विषबाधा झालेल्यांमध्ये गुरु सागर कुवर (वय ४) या बालकाची प्रकृती खालावल्याने त्याला तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. इतर सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रल्हाद गुठे आणि डॉ. ए. ए. मोमीन यांनी सांगितले. दरम्यान,गावात साथरोग सर्वेक्षणासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली असून, दररोज परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.