मालेगाव: वन विभागाने गुरुवारी शहरात मोठी कारवाई केली आहे. शहरातील बेलबाग भागात छापा टाकून वन्यप्राण्यांची शिकार आणि त्यांच्या मांसाची विक्री करणाऱ्या एका सराईत टोळीचा छडा लावण्यात आला आहे. या कारवाईत टोळीचा मुख्य सूत्रधार मुदस्सीर अहमद अकिल अहमद याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत.

​शहरातील बेलबाग चुनाभट्टी परिसरात वन्यप्राण्यांच्या मांसाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन खात्याच्या विशेष पथकाने मुदस्सीर अहमद याच्या घरावर धाड टाकली. या झडतीदरम्यान पथकाला धक्कादायक पुरावे सापडले. संशयीताच्या ताब्यात ​नर जातीच्या चिंकारा हरणाचे मुंडीसहित मांस,​२ मृत मोर,​१ गावठी कट्टा आणि १८ जिवंत काडतुसे,​सुरा, चॉपर, दुर्बीण, बॅटरी, कानस आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल आढळून आला. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

२० हून अधिक गुन्हे असलेला ‘सराईत’ शिकारी

​सहाय्यक वनसंरक्षक शेखर तनपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला संशयीत मुदस्सीर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीच वन्यजीव शिकारीचे २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या दृष्कृत्यात त्याच्यासोबत १० ते १५ जणांची टोळी सक्रिय असल्याचा वन खात्याचा संशय आहे.हे शिकारी नेमके कुठल्या वनक्षेत्रात शिकार करत होते आणि या साखळीत आणखी कोणाचे हात गुंतले आहेत, याचा तपास आता वन विभाग करत आहे.मुद्दस्सीर याच्या विरोधात यापूर्वी येसगाव येथे मोराची शिकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. नांदगाव,येवला व चाळीसगावमधील कन्नडच्या जंगल भागात वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याचे वन खात्याच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. मुदस्सीर याच्या विरोधात यापूर्वी तडीपार करण्याचा प्रस्ताव देखील सादर करण्यात आला होता.

कठोर कारवाईचा इशारा

​या यशस्वी कारवाईमुळे शिकारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. वन्यजीव शिकार आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी संशयीतावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयीत मुदस्सीर याच्या अन्य साथीदारांचा वन विभागातर्फे शोध घेतला जात आहे. उप वनसंरक्षक राकेश शेपट आणि सहाय्यक वनसंरक्षक शेखर तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गायत्री सोनवणे, वनपाल प्रफुल्ल पाटील, वनरक्षक योगेश पाटील, अनिल ठाकरे, रमेश बागूल, नागेश बागूल, संतोष भदाणे मल्हारराव पाटील, दीपक हिरे, स्वाती सावंत, गोपाळ गवळी आदींच्या पथकाने ही कारवाई फत्ते केली आहे.