​मालेगाव: नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथील कलेक्टर पट्टा भागात राहत्या घराचा स्लॅब अचानक कोसळल्याने आजी आणि नातवाचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या दुर्घटनेमुळे मालेगाव शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कशी घडली दुर्घटना?

​कलेक्टर पट्टा भागातील रहिवासी रामचंद्र पंढरीनाथ येवले यांच्या घरात ही हृदयद्रावक दुर्घटना घडली. शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांची आई विमलबाई येवले (वय ७२) आणि मुलगा चेतन येवले (वय २१) हे दोघे घराच्या हॉलमध्ये बसले होते. त्याच हॉलच्या एका कोपऱ्यात रामचंद्र यांची १७ वर्षांची मुलगी प्रणिती ही देखील बसली होती. यावेळी अचानक हॉलच्या भागाचा स्लॅब कोसळला.​स्लॅब कोसळल्याने विमलबाई व चेतन हे दोघेही सिमेंट-काँक्रीटच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. सुदैवाने हॉलच्या एका कोपऱ्यात बसलेली प्रणिती या दुर्घटनेतून बालंबाल बचावली आहे. दुर्घटना घडली तेव्हा घरात तिघेच होते.

​युद्धपातळीवर बचावकार्य

स्लॅब कोसळल्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घराकडे धाव घेतली. स्थानिक नगरसेवक मदन गायकवाड, छावणी पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान हे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आजी आणि नातवाला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढले व उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांना मृत घोषित केले.

पावसामुळे स्लॅब कमकुवत?

​या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दुर्घटनाग्रस्त घर साधारण २५ ते ३० वर्षे जुने होते. मालेगावात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसाच्या पाण्यामुळे स्लॅब कमकुवत झाला असावा आणि म्हणूनच तो कोसळला असावा,असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आजी व नातवाचा एकाच वेळी असा दुर्दैवी अंत झाल्याने येवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.