मालेगाव: तालुक्यातील ग्रामीण भागात अत्यंत छुप्या पद्धतीने सुरू असलेला विषारी दारू निर्मितीचा गोरखधंदा पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे उघडकीस आला आहे. पैशांच्या हव्यासापोटी मानवी आरोग्याचा विचार न करता, तस्करांकडून तद्दन ‘विषाचे’ मिश्रण उत्पादित करण्यात येत असल्याचे आढळून आले. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेने दोन हातभट्टयांवरील २ लाख २ हजार रुपयांचे घातक रसायन जप्त करून जागीच नष्ट केले.
जिल्ह्यातील दुर्गम भाग, डोंगरदऱ्या आणि नद्यांच्या कडेला लपून सुरू असलेल्या गावठी दारुच्या हातभट्टयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काष्टी शिवारात छापा टाकला. मोसम नदीच्या किनारी अत्यंत दुर्गम ठिकाणी काटेरी झाडाझुडपांत दोन हातभट्टया सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलीस पथक जवळ पोहोचताच, संशयित आरोपी विष्णू अशोक सोनवणे आणि केदार तुळशीराम गायकवाड (दोघेही रा. काष्टी, ता. मालेगाव) यांनी नदीपात्रातून पलायन केले. पोलिसांनी घटनास्थळावरून नवसागर मिश्रित रसायन आणि दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केले.
दारू की विष?
मोसम नदीच्या काठावर काटेरी झाडाझुडपांमध्ये सुरू असलेल्या या गोरखधंद्यात केवळ गावठी दारूच नाही, तर अक्षरशः ‘स्लो पॉयझन’ तयार केले जात असल्याचे समोर आले आहे. या हातभट्टयांवर दारू लवकर सडवण्यासाठी आणि नशा वाढवण्यासाठी जे पदार्थ वापरले जात होते, ते पाहून पोलीसही चक्रावून गेले. दारूचे रसायन लवकर तयार व्हावे यासाठी त्यात युरियाचा सर्रास वापर केला जात होता. तसेच दारू सेवन करणाऱ्यांमध्ये नशेची तीव्रता वाढविण्यासाठी बॅटरीमधील शिसे आणि घातक रसायनांचे मिश्रण केल्याचे आढळून आले. तसेच या गावठी दारू निर्मितीसाठी चक्क नाल्यातील घाणेरड्या पाण्याचा वापर केला गेल्याचे पथकाला आढळून आले. अशा प्रकारच्या घातक रसायनांमुळे यकृत आणि किडनी निकामी होण्यासोबतच अंधत्व येण्याचा धोका असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात दोन्ही संशयीताच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी अशा अवैध दारु अड्डयांची माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसातर्फे करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक दत्ता कांभीरे, हवालदार सुभाष चोपडा, दत्ता माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
