मालेगाव: शहरालगतच्या दरेगाव शिवारातील धरणाजवळ गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत प्लास्टिक कारखाना आणि डांबर प्लांट बिनदिक्कतपणे सुरू आहे. या कारखान्यांमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे आणि दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत असताना प्रशासनाकडून या कारखान्यांविरोधात कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. प्रशासनातर्फे केल्या जाणाऱ्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच हे दुर्लक्ष ‘अर्थपूर्ण’ आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

​दरेगाव भागातील शेतात हे प्लास्टिक कारखाने अत्यंत नियोजनबद्ध रीतीने चालवले जातात. विशेष म्हणजे, हे कारखाने बाहेरून कोणाला दिसू नयेत,यासाठी कारखानदारांनी सभोवताली मोठी झाडे लावून नैसर्गिक कुंपण तयार करण्यात आले आहे. दिवसा वेगवेगळ्या ठिकाणांहून येथे प्लास्टिक कचरा जमा केला जातो आणि रात्रीच्या अंधारात तो जाळून त्यापासून पीपी, व्हाईट दाना व गिट्टी तयार केली जाते. प्लास्टिक वितळवण्याच्या या प्रक्रियेमुळे रात्री ११ वाजेनंतर संपूर्ण परिसरात उग्र दर्प पसरतो. या उग्र दर्पामुळे इनामदार, कोकणदरा, सय्यद पार्क आणि केडी पार्क या वस्त्यांमधील रहिवाशांना श्वास घेणेही कठीण झाले आहे.

​नियमांची ऐशी की तैशी

​केवळ प्रदूषणच नव्हे, तर या कारखान्यांमध्ये व्यावसायिक वापरासाठी शेतीची वीज वापरली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वीज वितरण कंपनीच्या डोळ्यादेखत ही फसवणूक सुरू असताना अधिकारी याकडे कानाडोळा का करत आहेत? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. यासोबतच कोकणदरा भागात सुरू झालेल्या डांबर प्लांटमुळे प्रदूषणात आणखी भर पडली आहे. या दोन्ही कारखान्यांमुळे परिसराला प्रदूषणाचा विळखा बसला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा

​रात्रभर पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे लहान मुलांना सर्दी, खोकला आणि दम्यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. या परिसरात वास्तव्यास असलेले बहुसंख्य नागरिक हे अशिक्षित आहेत. तसेच मोलमजुरी व यंत्रमाग कारखान्यांमध्ये काम करणारे गरीब कामगार आहेत. तेथील रहिवाशी हे सोशिक आहेत तसेच आपल्या हक्कांविषयी फारसे ते जागरूक नाहीत. परिणामी तक्रार करण्यास ते धजावत नाहीत. त्याचाच हे कारखानदार गैरफायदा घेत असल्याचे स्थानिक रहिवासी शेख जुबेर यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या बेकायदेशीर प्लास्टिक कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले असतानाही, मालेगाव महानगरपालिका आणि महसूल प्रशासन कमालीची उदासिनता दाखवत आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत प्लास्टिक कारखाने सुरूच आहेत. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचे उघड उल्लंघन होत असताना प्रशासनाकडून कारवाई का होत नाही? प्लास्टिक कारखान्याप्रमाणे बेकायदेशीर साबण कारखाने आणि कत्तलखान्यांवर देखील कारवाई करणे गरजेचे आहे.
— निखिल पवार (सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव)