मालेगाव: मालेगाव शहरासह परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचत धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात मालेगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी कर्नाटक राज्यातील बिदर येथून मुख्य संशयीताला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे १० गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही गुन्ह्यांचा देखील छडा लागण्याची शक्यता आहे.

​१ मार्च २०२६ रोजी मालेगावच्या सटाणा नाका परिसरात एका महिलेची ३ तोळ्यांची सोन्याची पोत दुचाकीवरून भरधाव वेगाने आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली होती. सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष तपास पथके गठित केली गेली होती. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कर्नाटक राज्यातील बिदर येथील ‘इराणी मोहल्ला’ परिसरात संशयीत लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बिदर येथे ५ दिवस वेशांतर करून पाळत ठेवली आणि मुस्तफा अली इसा अली (२०, मूळ रा. भुसावळ) याला शिताफीने ताब्यात घेतले.

​ १० गुन्ह्यांची दिली कबुली

​ताब्यात घेतलेल्या मुस्तफा अली याने आपल्या साथीदारांसह मालेगाव शहरात भरधाव वेगाने मोटारसायकल चालवत काही महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेल्याची कबुली दिली. त्यानुसार ​मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात दाखल असलेले ६, कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेले ३ व येवला पोलीस ठाण्यात दाखल असलेला एक असे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत. संशयीत चोरटे गुन्हे करण्यासाठी प्रामुख्याने रॉयल एनफिल्डची ‘हन्टर’ आणि बजाज कंपनीची ‘पल्सर एन एस’ यांसारख्या वेगवान गाड्यांचा वापर करत असत. मुस्तफा अली याने सादिक अली इबादत अली, (रा. भुसावळ, जि. जळगाव), भोला सज्जाद अली,( रा. भापोळ,मध्यप्रदेश),अब्बास अली इबादत अली, (रा. भुसावळ, जि. जळगाव) व अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपुर येथील एक अशा आणखी चार साथीदारांची नावे सांगितली. हे संशयीत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात विविध गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कुणी केली ‘ही’ कारवाई फत्ते?

जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीरसिंह संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक सिध्दार्थ बारवाल व दर्शन दुगड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार शाम पवार, शरद मोगल, विशाल गोसावी, सचिन वराडे, नरेंद्रकुमार कोळी, योगेश कोळी, संदिप राठोड, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार दिनेश शेरावते, सचिन बेदाडे, राकेश जाधव, राम निसाळ,तांत्रिक विभागाचे हवालदार हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी बजावली.