मालेगाव : मुख्यमंत्रीपदावर स्थानापन्न झाल्यावर ग्रामीण महाराष्ट्राचा दौरा करताना एकनाथ शिंदे सर्वप्रथम मालेगावला भेट देणार असून त्यांच्या स्वागतासाठी मालेगाव नगरी सज्ज झाली आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री चार तपांपासून प्रलंबित असलेल्या मालेगाव जिल्हा निर्मितीच्या मागणीची पूर्तता करतील का, याविषयी उत्कंठा निर्माण झाली आहे. दुसरीकडे, शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद लक्षात घेत सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून शिवसैनिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मालेगाव येथे शनिवारी सकाळी ११ वाजता विभागीय आढावा बैठक होणार आहे. बैठकीस नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विभागातील पर्जन्यमानाची स्थिती आणि महत्त्वाच्या विकास कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर कॉलेज मैदानावर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

शिंदे हे मालेगावी शुक्रवारी रात्रीच येणार असून मुख्यमंत्र्यांनी मालेगावला मुक्काम करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. आढावा बैठकीपूर्वी शनिवारी सकाळी विविध संस्था, संघटनांच्या शिष्टमंडळांच्या भेटी घेऊन शिंदे हे लोकांच्या समस्या, सूचना जाणून घेणार आहेत. या दौऱ्यानिमित्ताने शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी आमदार दादा भुसे आणि समर्थकांनी केली आहे. कार्यकर्ता मेळाव्यासाठी जलरोधक शामियाना उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शहरात जागोजागी भगव्या कमानी उभारण्यात आल्या आहेत.

दौऱ्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा़ंचीही लगबग सुरू आहे. शासकीय विश्रामगृहास रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येऊन साफसफाई करण्यात आल्याने काही प्रमाणात शहराचे रुपडे बदलल्याची प्रचीती येत आहे.

शिवसैनिकांना नोटिसा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शिवसैनिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. दौऱ्यात नाशिक येथे कुठलाही जाहीर कार्यक्रम नाही. मालेगाव, येवला या ठिकाणी त्यांचे स्वागत होणार आहे. मालेगाव येथे सभा होईल. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांना कलम १४९ अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.