मालेगाव : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. त्यातल्या त्यात विरोधी पक्षांमधील अनेक नेते व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा ओढा वाढला असल्याचे चित्र आहे. आता याच मालिकेत मालेगावमधील आणखी एका बड्या नेत्याचा भाजप प्रवेश होणार आहे. बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक व गेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदार संघात मंत्री दादा भुसे यांच्यापुढे आव्हान निर्माण करणारे बंडूकाका बच्छाव हे भाजपच्या वाटेवर आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस बच्छाव यांच्या भाजप प्रवेशाची तयारी सुरू झाली आहे.

बंडूकाका बच्छाव हे मंत्री भुसे यांचे एकेकाळी खंदे समर्थक होते. मधल्या काळात दोघांमध्ये बिनसल्यानंतर काही काळ सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहणे बच्छाव यांनी पसंत केले होते. त्याचवेळी बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातील कार्य मात्र त्यांनी नेटाने पुढे सुरू ठेवले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते अचानक शिवसेना ठाकरे गटात सक्रिय झाले होते. काही काळ राजकारणापासून दूर राहिलो तरी आपण शिवसेना पक्ष कधी सोडला नाही, असे म्हणत मालेगाव बाह्य मतदार संघात उमेदवारीसाठीचा दावा त्यावेळी त्यांनी केला होता. तथापि त्याआधी जेव्हा शिवसेनेत फूट पडली होती, त्यावेळी पक्ष प्रवेश करणाऱ्या अद्वय हिरे यांच्या उमेदवारीला ठाकरे गटाने पसंती दिली. त्यामुळे बच्छाव यांनी अपक्ष उमेदवारी करत दंड थोपटले होते. भुसे,बच्छाव व हिरे यांच्यामध्ये रंगलेल्या या तिरंगी सामन्यात बच्छाव हे भुसे यांच्याकडून पराभूत झाले तरी त्यांनी दुसरे स्थान राखले होते. हिरे हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बच्छाव यांनी शिवसेना ठाकरे गट किंवा भाजपमध्ये प्रवेश करावा, असा दबाव त्यांच्या समर्थकांकडून वाढत होता. त्यामुळे बच्छाव हे वरील दोघांपैकी एका पक्षात जातील,अशी अटकळ गेल्या काही दिवसांपासून बांधली जात होती. आता लवकरच पंचायत समिती,जिल्हा परिषद तसेच मालेगाव महापालिकेची निवडणूक लागणार आहे. हा मुहूर्त शोधून बच्छाव यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नुकतीच भेट घेतली आणि भाजप प्रवेशाच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यानंतर गेली दोन दिवस त्यांनी आपल्या निवासस्थानी समर्थक-कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन भावना जाणून घेतल्या. जवळपास सर्वच कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा कल दाखवल्याने बच्छाव यांनी तसा निर्णय घेतल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मालेगाव येथे भव्य प्रवेश सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात समर्थकांसह हा प्रवेश करण्याचा बच्छाव यांचा मनोदय आहे. बच्छाव यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे आणि दांडगा जनसंपर्क देखील आहे. तसेच त्यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे मालेगाव शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात भाजपला आणखी बळ प्राप्त होईल. परिणामी मालेगावातील सत्ता स्पर्धा आणखी तीव्र होईल,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.