मालेगाव : पाण्यासाठी वर्षानुवर्षे चातकासारखी वाट पाहणाऱ्या मालेगाव तालुक्यातील दुष्काळी माळमाथा भागात आता विकासाची नवी पहाट अवतरणार आहे. महत्त्वाकांक्षी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या अनुषंगाने तब्बल ४५० कोटींची स्वतंत्र सिंचन व पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे माळमाथा परिसरातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार असून, ६७ गावांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र शासनाने ५ सप्टेंबर २०२४ रोजी ७,४६५.२९ कोटी खर्चाच्या नार-पार-गिरणा नदीजोड योजनेस मंजुरी दिली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील ४,११६ कोटींच्या कामाचा कार्यारंभ आदेश नुकताच प्रदान करण्यात आला असून या टप्प्यात १०.६४० टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. याच प्रकल्पाच्या अनुषंगाने मंजूर झालेली ४५० कोटींची स्वतंत्र योजना माळमाथा भागासाठी वरदान ठरणार आहे. या योजनेंतर्गत कालव्यांची क्षमता वाढवणे, आधुनिक उपसा जलसिंचन आणि बंदिस्त नलिका पद्धतीची कामे केली जाणार आहेत. यात गिरणा डाव्या कालव्याची क्षमता १७९ वरुन ३४५ तर उजव्या कालव्याची क्षमता २२१ वरुन ३३९ क्युसेसपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
डाव्या कालव्यातून अजंग बंधारा व तेथून मोसम नदीवरील बंधाऱ्यापर्यंत उपसा पद्धतीने पाणी पोहोचवणे, या बंधाऱ्यातून उपसा पद्धतीनेच वळवाडी येथे पाणी पोहोचवणे, पूढे वळवाडी बंधाऱ्यापासून खाकुर्डी, कंक्राळे, कुकाणे, करंजगव्हाण, हाताने, टोकडे, जळकु आदी गावांपर्यंत गुरुत्वीय बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी देणे या कामांचा या सिंचन योजनेत समावेश आहे. वळवाडी बंधार्यापासून बंदिस्त जलवाहिनीद्वारे विराणे पाझर तलावात पाणी देण्यात येणार आहे. तेथून बोरी नदीमार्गे बोरी-आंबेदरी धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अजंग बंधाऱ्यातून गुरुत्वीय पद्धतीने वडेल बंधाऱ्यास आणि त्यानंतर मोसमसाळ कालव्याच्या माध्यमातून देखील लाभक्षेत्रातील गावांना पाणी देण्यात येणार आहे.
या स्वतंत्र योजनेतील ६७ कोटींच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विविध पक्षीय नेते व शेतकरी प्रतिनिधींसमवेत या कामांचा पाहणी दौरा केला. याप्रसंगी भुसे यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष किशोर इंगळे, बाजार समितीचे सभापती चंद्रकांत शेवाळे आदी उपस्थित होते. नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन व्यवस्था बळकट होणार असल्याने आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल,असा विश्वास भुसे यांनी या निमित्ताने व्यक्त केला.
