मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या सत्ता समीकरणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काँग्रेस पाठोपाठ भाजपनेही ‘इस्लाम’ पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. तसे झाल्यास भाजप, काँग्रेस, समाजवादी पार्टी व इस्लाम या चार पक्षांची अजब महायुती येथे आकारास येईल. मालेगावातील या संभाव्य महायुतीमुळे इस्लाम पक्षाचे सत्ता स्थापन करण्याचे गणित जुळणे आणखी सुलभ होणार आहे.
मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांची निवडणूक घेण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच सत्ता समीकरणाचे गणित जुळविण्यासाठी राजकीय घडामोडींनी अचानक वेग घेतला.
महापालिकेत एकूण ८४ जागा आहेत. १५ जानेवारीला पार पडलेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले नसले तरी इस्लाम पक्षाला सर्वाधिक ३५ जागा मिळाल्या आहेत. त्या खालोखाल ‘एमआयएम’ ला २१ व शिवसेना शिंदे गटाला १८ जागा मिळाल्या आहेत.
समाजवादी पार्टी, काँग्रेस व भाजपाला अनुक्रमे ५,३ व २ जागा मिळाल्या आहेत. इस्लाम व समाजवादी पार्टीने सेक्युलर फ्रंट नावाची आघाडी करून ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे या आघाडीचे संख्याबळ ४० झाले आहे. या आघाडीला बहुमतासाठी आणखी तीन सदस्यांची गरज असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्या दृष्टीने जुळवाजुळव सुरू होती.
पडद्याआड घडामोडींना वेग
काँग्रेसचे महानगरप्रमुख एजाज बेग यांनी सेक्युलर फ्रंट या आघाडीला पाठिंबा दर्शविण्याचे सुतोवाच सुरुवातीलाच केले होते. त्यामुळे या आघाडीला बहुमताचा ४३ आकडा गाठणे शक्य होणार असल्याची खात्री बळावत होती. मात्र पडद्याआड आणखी काही घडामोडी घडत होत्या. एमआयएम व शिवसेना शिंदे गटाने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा शहरात रंगली होती. हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांचे संख्याबळ ३९ होते. एमआयएम व शिंदे गटाच्या संभाव्य युतीला काँग्रेसने पाठिंबा दिल्यास हे संख्याबळ ४२ पर्यंत जाऊ शकते.
अशा स्थितीत भाजपच्या दोन सदस्यांनी पाठिंबा दिला किंवा तटस्थ राहण्याची भूमिका घेतली तर या युतीला सत्तेचे गणित जुळविणे शक्य होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इस्लाम पक्षाचे संस्थापक माजी आमदार आसिफ शेख यांनी एमआयएम व शिंदे गटाने सत्ता स्थापन केली तर सेक्युलर फ्रंटची भूमिका विरोधात बसण्याची राहील, असे जाहीर केले. त्यामुळे महापालिकेत कुणाची सत्ता स्थापन होईल, याविषयी काहीसा संभ्रम निर्माण झाला होता.
भाजप – काँग्रेसची आघाडी ?
महापालिकेच्या सत्ता समीकरणासाठी काँग्रेसची भूमिका केंद्रस्थानी आल्याने हा पक्ष नेमका कुणाला पाठिंबा देणार, याबद्दल उत्कंठा निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पक्षाचे महानगर प्रमुख एजाज बेग व सेक्युलर फ्रंटचे नेते व नगरसेवकांची बुधवारी रात्री बैठक झाली. या बैठकीत सत्ता स्थापन करण्याबद्दल एकमत झाल्याचे बेग यांनी जाहीर केले आहे. तसेच भाजपचे दोन व काँग्रेसचे तीन अशा पाच सदस्यांचा महापालिकेत भारतीय विकास आघाडी या नावाचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात येणार असून शुक्रवारी किंवा सोमवारी या गटाची अधिकृत नोंदणी केली जाईल, असे बेग यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस व भाजपच्या गटाने पाठिंबा दिल्यावर सेक्युलर फ्रंटचा बहुमताचा आकडा ४५ पर्यंत जाणार आहे, असेही ते म्हणाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे यांनी मात्र असा गट स्थापन करण्याचा किंवा कुणाला पाठिंबा देण्याचा अद्याप तरी निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

