​मालेगाव: मालेगाव महानगरपालिकेच्या राजकारणात गेल्या तीन-चार दिवसात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुन्हा एकदा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा बघावयास मिळाला. भाजप आणि काँग्रेसच्या अनपेक्षित युतीचा प्रयोग फसल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने अचानक उचल खाल्ली असून महापौर पद मिळविण्यासाठी फासे टाकणे सुरू केल्याचे दिसत आहे. दुसरीकडे एमआयएमने महापौर पदासाठी उमेदवारच न दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एमआयएम व शिवसेना शिंदे गटाचे नेते अधिकृतपणे बोलत नसले तरी महापालिकेतील सत्ता सोपान प्राप्त करण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात,अशी अटकळ आता बांधली जाऊ लागली आहे.

मंगळवारी महापौर,उपमहापौर पदासाठी​ उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटातर्फे लता घोडके यांनी महापौर पदासाठी तर, नरेंद्र सोनवणे व नीलेश काकडे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज सादर केले आहेत. इस्लाम पक्षाच्या ताहेरा शेख यांनी देखील महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेख यांचा हा अर्ज डमी असल्याचे सांगण्यात येते. सोमवारी सेक्युलर फ्रंटतर्फे इस्लाम पक्षाच्या नसरीन बानो शेख खालीद यांनी तर उपमहापौर पदासाठी समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद यांनी अर्ज दाखल केला होता. मंगळवारी समाजवादी पार्टीचे मुस्तकीम डीग्निटी यांनी देखील उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे.

एमआयएमची उपमहापौर पदासाठी खेळी?

२१ जागा मिळणाऱ्या एमआयएम पक्षातर्फे महापौर पदासाठी कोणाला मैदानात उतरवले जाते, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, एमआयएम पक्षाने महापौरपदासाठी अर्जच न भरल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्षाने महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असली तरी, उपमहापौरपदासाठी या पक्षातर्फे अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यात आला आहे. आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांचे चिरंजीव हाफिज अब्दुल्ला यांनी उपमहापौरपदासाठी हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपहापौर पद मिळविण्यासाठी एमआयएम हा पक्ष नेमकी कोणती खेळी करणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

शिंदे गट अचानक स्पर्धेत

गेल्या शुक्रवारी​ भाजपचे दोन व काँग्रेसचे तीन अशा पाच सदस्यांनी एकत्र येऊन ‘भारतीय विकास आघाडी’ नावाचा गट स्थापन केला होता. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी मात्र या गटाला मान्यता दिली नाही. त्यामुळे या दोन्ही गटांचा सोमवारी काडीमोड झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी शिवसेना शिंदे गट महापालिकेच्या राजकारणात अचानक सक्रिय झाला. महापौर व महापौर या दोन्ही पदांसाठी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

​ सत्तेचे गणित कोण सोडविणार ? ​सध्याच्या स्थितीत महापौरपदासाठी तीन, तर उपमहापौरपदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. आकड्यांच्या गणितानुसार परिस्थिती अत्यंत चुरशीची झाली आहे. सेक्युलर फ्रंटचे स्वतःचे ४० सदस्य असून, काँग्रेसच्या ३ सदस्यांच्या पाठिंब्याने हे संख्याबळ बहुमत गाठण्या इतके म्हणजे ४३ पर्यंत पोहोचत आहे. निवडणूक लढविण्याचे ठरविले तर शिंदे गट (१८ जागा) व एमआयएमला (२१ जागा) एकत्र येणे भाग आहे. तसे झाले तर या युतीचे संख्याबळ ३९ पर्यंत जाते. अशा वेळी २ सदस्य असलेल्या भाजपची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दिल्यास संख्याबळाचा आकडा ४१ वर जाईल. अशा परिस्थितीत सेक्युलर फ्रंटच्या (४३) विरोधात शिंदे गट (४१) असा अटीतटीचा सामना पाहायला मिळेल. भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली तर मात्र सेक्युलर फ्रंटसाठी महापालिकेतील सत्ता स्थापन करण्याचा मार्ग आणखी सोपा होणार आहे. इस्लाम पक्षाचे संस्थापक आसिफ शेख हे आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे,असा दावा करीत आहेत. त्याचवेळी शिंदे गटाने ऐनवेळी महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली वेगवान केल्या आहेत. शिंदे गटाचे नेते व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे त्यासाठी कोणता ‘मास्टर स्ट्रोक’ मारतात,याबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे.