मालेगाव: मालेगाव शहराची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि मालेगाव मर्चन्टस् को. ऑप बँक लि. (मामको बँक) या बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. ३१ मार्च अखेर बँकेला ८ कोटी १७ लाख २१ हजार रुपयांचा विक्रमी ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा मनिषा देवरे यांनी दिली आहे. बँकेच्या ठेवींमध्ये दरवर्षी वाढ होत आहे, तसेच बँकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचा दावा देखील देवरे यांनी केला आहे.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ताळेबंद मांडण्यासाठी संचालक मंडळाने बँकेच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने सभासदांसाठी १० टक्के (सुमारे ८० लाख रुपये) लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळांने घेतला आहे. त्यानुसार रिझर्व्ह बँकेकडे शिफारस करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ठेवींच्या वाढीत सातत्य 

सहकार क्षेत्रातील अनेक बँका सद्य:स्थितीत या-ना-त्या कारणाने अडचणीत आल्या असताना मामको बँकेने मात्र प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यात यश मिळवले आहे. सभासदांच्या दृढ विश्वासामुळे दरवर्षी बँकेच्या ठेवींमध्ये वाढ होत आहे.​ गेल्या वर्षी २८३ कोटींच्या ठेवी जमा झाल्या होत्या. यावर्षी त्यात वाढ होऊन २८७ कोटी १६ लाख रुपयांपर्यंत एकूण ठेवी पोहोचल्या आहेत. कर्ज वाटप १५१ कोटी ४ लाख रुपयांवर गेले आहे. बँकेचा एकूण निधी ५४ कोटी १९ लाख तर गुंतवणूक १६८ कोटी ४२ लाख इतकी आहे. बँकेची स्वतःची पुंजी (नेटवर्थ) २७ कोटी ४९ लाख रुपये असून भांडवल पर्याप्तता १९.७७ टक्के इतकी समाधानकारक पातळीवर आहे. नियोजनबद्ध वसुलीमुळे बँकेने आपली अनुउत्पादक मालमत्ता (नेट एनपीए) शून्य टक्क्यांच्या खाली राखण्यात सातत्य मिळवले आहे. आधुनिक बँकिंग सेवेवर भर देताना बँकेने आरटीजीएस,एनईएफटी, एटीएम,आयएमपीएस आणि मोबाईल बँकिंग सेवा कार्यान्वित केल्या असून, लवकरच युपीआय आणि क्यूआर कोड सेवा सुरू केल्या जाणार असल्याचे देवरे यांनी सांगितले.

सोने तारण,वाहन कर्जासाठी ९ टक्के व्याजदर 

​बँकेचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले यांनी गेल्या काही वर्षांपासून बँकेचा चढता आलेख कसा उंचावत आहे आणि भविष्यात बँकिंग प्रणालीमध्ये काय सुधारणा करण्यात येणार आहेत,यावर प्रकाश टाकला. व्यापारी आणि सर्वसामान्यांसाठी सोनेतारण व वाहन कर्ज अवघ्या ९ टक्के दराने उपलब्ध आहे, तर लघु उद्योजकांसाठी ११ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला असल्याचे भोसले यांनी नमूद केले. कर्जावरील व्याजदर अधिकाधिक आकर्षक करण्यावर बँकेचा भर आहे, असे ते म्हणाले. बँकेच्या वर्धमान नगर शाखेचे नूतनीकरण सुरू असून, कॅम्प, संगमेश्वर आणि रावळगाव शाखेसाठी स्वमालकीच्या जागा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही भोसले यांनी सांगितले.

पारदर्शक व्यवहारांची ग्वाही 

उपाध्यक्ष उमेश अस्मर यांनी पारदर्शक व्यवहारांची ग्वाही देत मामको बँकेत कोणतेही छुपे चार्जेस आकारले जात नाहीत तसेच मुदतपूर्व कर्ज परतफेडीवर कोणताही दंड आकारला जात नाही, असे स्पष्ट केले. बँकेच्या प्रगतीत सभासद, ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असल्याचेही अस्मर यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला संचालक सतीश कलंत्री, शरद दुसाने, अशोक बैरागी, संजय दुसाने, नंदू तात्या सोयगावकर, नरेंद्र सोनवणे, भिका कोतकर, भास्कर पाटील, रवींद्र ओस्तवाल, गौतम शाह, शरद पाटील, अलका भावसार, विठ्ठल बागूल, छगन बागूल, महाव्यवस्थापक वीरेंद्र होनराव आदी उपस्थित होते.