मालेगाव: बकरी ईदच्या दिवशी प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरल्याचे आणि मोसम नदीपात्रात पुन्हा एकदा रक्तमिश्रित पाणी वाहिल्याचे दृश्य दिसल्याने मालेगावात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. यासंदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरल्याचे पाहायला मिळाल्याने संतप्त झालेले सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी गुरुवारी नदी परिसरात धाव घेऊन आंदोलन छेडले. या आंदोलनाची गंभीर दखल घेत अखेर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड चालवली आहे.
बकरी ईदला कुर्बानी देताना जनावरांची कत्तल अनेकदा रस्त्यांवर होत असते. त्यामुळे रक्तमिश्रित पाणी गटारांद्वारे थेट मोसम नदीपात्रात येते. मोसम नदीचे हे पाणी पुढे गिरणा धरणात जाते, जिथून लाखो नागरिकांना पिण्याचा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी निगडित असणाऱ्या या समस्येच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून मालेगावकर लढा देत आहेत. त्याची दखल घेत यंदा रस्त्यांवरील बेकायदेशीर कत्तल रोखण्यासाठी महापालिकेने तात्पुरत्या कत्तलखान्यांची संख्या १२ वरून थेट २५ केली होती. तसेच ड्रोन कॅमेरे आणि विशेष पथकांद्वारे २४ तास नजर ठेवण्याचे दावे प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी मोसम नदीत रक्ताने माखलेले पाणी वाहताना दिसल्याने प्रशासनाचा हा दावा केवळ कागदावरच राहिल्याचे स्पष्ट होत आहे.
..अन् पुन्हा ठिय्या आंदोलन
गेल्या १७ वर्षांपासून या समस्येविरोधात लढा देणारे ‘सार्वजनिक नागरी सुविधा समिती’चे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी नदीपात्रातील रताळलेले पाणी बघताच आक्रमक पवित्रा घेतला. सांडवा पुलावरच त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला ‘आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती’चे निखिल पवार,भाजपचे देवा पाटील, मराठा महासंघाचे भरत पाटील,गोरक्षक मच्छिंद्र शिर्के आदी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. या आंदोलनामुळे प्रशासनाची मोठी धांदल उडाली. अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, प्रांताधिकारी नितीन सदगीर, सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तथापि,आंदोलकांनी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी लावून धरल्यानंतर आयुक्त रवींद्र जाधव यांनी महापालिकेतील तीन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश जारी केले.
अधिकाऱ्यांवर ठपका काय?
शहर अभियंता कैलास बच्छाव, स्वच्छता विभागाचे साहाय्यक आयुक्त अनिल पारखे व प्रभाग अधिकारी श्याम बुरकुल अशी निलंबित करण्यात आलेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांची नावे आहेत. जिल्हाधिकारी व मनपाच्या सक्त आदेशांनंतरही मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना न करणे, कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर व बेजबाबदार वर्तन करणे, यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन करणे, असा गंभीर ठपका निलंबित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमान्वये निलंबित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी देखील प्रस्तावित करण्यात आली आहे. दरम्यान,बेकायदेशीर कत्तल रोखण्यासाठी नेमून दिलेल्या कामात कुचराई करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल, असे आश्वासन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
