मालेगाव: मोसम नदीत मिसळणारे जनावरांचे रक्त आणि उद्योगांचे घातक रसायनयुक्त पाणी रोखण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाविरोधात ‘सार्वजनिक नागरी सुविधा समिती’ने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे जल प्रदूषण तात्काळ थांबवावे आणि या गंभीर समस्येकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी,या मागणीसाठी समितीच्या वतीने गुरुवारपासून येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
नेमकी समस्या काय?
मालेगाव शहरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर जनावरांची अनाधिकृत कत्तल केली जाते. या कत्तलींनंतर निघणारे रक्तमिश्रित पाणी थेट गटारांद्वारे मोसम नदीपात्रात सोडले जाते. एवढेच नव्हे तर, शहरातील साइजिंग व इतर उद्योगांचे कोणतीही प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त पाणीही याच नदीत येऊन मिळते. मोसम नदीचे हेच प्रदूषित पाणी पुढे गिरणा धरणात वाहून जाते.
विशेष म्हणजे, मालेगावसह शेजारच्या नांदगाव आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याची तक्रार केली जात आहे. तसेच, नदीपात्रात साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीच्या आजारांचा सामना करण्याची पाळीदेखील नागरिकांवर येत आहे.
१७ वर्षांपासून लढा पण्…
मालेगाव येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे हे गेल्या १७ वर्षांपासून या प्रदूषणाविरोधात सातत्याने लढा देत आहेत. ‘मोसम नदी सुधार योजने’च्या नावाखाली शासनाचे शेकडो कोटी रुपये खर्च झाले, परंतु प्रत्यक्षात नदीची स्थिती ‘जैसे थे’च आहे. रस्त्यावरील अवैध कत्तलींचे रक्तमिश्रित पाणी आणि प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त पाणी नदीत सोडणे अद्यापही बंद झालेले नाही.
समितीच्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी याप्रश्नी महापालिका, महसूल आणि पोलीस प्रशासनाची समिती पदाधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली होती. त्यावेळी दोन महिन्यांत हा प्रश्न निकाली काढण्याचे स्पष्ट आदेश शर्मा यांनी दिले होते. मात्र, आज जवळपास वर्ष उलटूनही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी प्रत्येक वेळी केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेत असल्याचा आरोप समितीतर्फे करण्यात आला आहे.
अखेर बेमुदत उपोषणाचे हत्यार
प्रशासनाच्या या चालढकल वृत्तीला कंटाळून समितीने अखेर ‘बेमुदत उपोषणाचे’ हत्यार उपसले आहे. समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. रक्तमिश्रित पाणी प्रदूषणाची समस्या सोडण्याबरोबरच वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे.
या आंदोलनामुळे आता तरी प्रशासनाला जाग येणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. बोरसे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार,भरत पाटील,शेखर पगार, गुलाब पगारे,मच्छिंद्र शिर्के,गोपाल सोनवणे,चितेश असेरी,अक्षय महाजन,रमेश सकट,अनिल जाधव,राकेश पाटील,जयदीप जगताप, तुषार छाजेड, दिलीप पाटील, दिनेश साबणे, प्रदीप पहाडे, विनोद निकम, राकेश मगर, सागर पवार, ॲड. योगेश निकम, ललित गोरस, रमेश वाणी, सिद्धार्थ वारुळे, अतुल शिरोडे, वाहिब खान, रईस शहा, शकीद शेख, नीलेश सोनवणे, अक्षय वाघ, रामदास बच्छाव, रमेश जगताप आदी कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.
