मालेगाव: पदभार स्वीकारताच महापालिकेच्या प्रभारी आयुक्त तथा धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचा ‘ॲक्शन मोड’ मंगळवारी भल्या पहाटेच मालेगावकरांना पाहायला मिळाला. शहरात अचानक पाहणी दौऱ्यावर निघालेल्या विसपुते यांनी कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या गटारी आणि प्लास्टिक गिळणाऱ्या मोकाट जनावरांच्या विद्रूप चित्रावरून अधिकाऱ्यांची कडक कानउघाडणी केली. किदवाई रोडवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचे आदेश देत त्यांनी प्रशासनाला गतिमान केले; तर अस्वच्छतेला कारणीभूत ठरणाऱ्या कमालपुऱ्यातील अवैध कत्तलखान्यांच्या विळख्यावर बोट ठेवत, ‘मी कारवाईसाठी आत आले तर तुम्हाला बाहेर जावे लागेल’,असा सज्जड दम या व्यावसायिकांना देत यापुढे बेकायदा प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत,हा संदेश त्यांनी दिला आहे.
लाचप्रकरणी तत्कालीन आयुक्त रवींद्र जाधव यांच्या अटकेनंतर रिक्त झालेल्या येथील आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शनिवारी पदभार स्वीकारताच विसपुते यांनी आपल्या आक्रमक कार्यशैलीची चुणूक दाखवून दिली होती. पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी खातेप्रमुखांची तातडीची बैठक घेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील अस्वच्छतेवर बोट ठेवत, ‘खुद्द मुख्यालयाचीच अशी दुरवस्था असेल, तर संपूर्ण शहराची काय अवस्था असेल?’ असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केला. त्याचवेळी तीन दिवसात शहरातील अस्वच्छता दूर करावी, अशी तंबी देखील त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली होती.
अधिकारी-कर्मचारी धारेवर
तीन दिवसांची ही मुदत संपल्यावर मंगळवारी विसपुते या भल्या सकाळी धुळ्याहून मालेगावला पोहोचल्या. त्यांनी सर्वप्रथम द्याने येथील स्वच्छता विभागाच्या हजेरी सेंटरवर ‘सरप्राईज व्हिजिट’ केली. त्यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांची तपासणी केली. नंतर एटीटी हायस्कूल जवळील हजेरी सेंटरला भेट दिली. एव्हाना प्रभारी आयुक्त विसपुते या पाहणी करीत असल्याची वार्ता कानी पडताच महापालिकेचे अन्य जबाबदार अधिकारी, कर्मचारी तेथे धावपळ करत पोहोचले. तपासणी केल्यावर विसपुते यांनी सेंटरवरील हजेरी पुस्तिका ताब्यात घेण्याचे आदेश दिले. यानंतर किदवाई रोडवरील दुर्गंधी,प्लास्टिक कचऱ्याचे ढिग तसेच अतिक्रमणे बघून त्या अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. प्लास्टिक बंदी असताना एवढा कचरा कसा आला, असा सवाल त्यांनी केला. तसेच तेथील अतिक्रमणांचा विळखा बघून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. हे अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे आदेशही त्यांनी दिले.
‘…म्हणून मीही कचरा टाकते’
दरम्यान, आयुक्तांचा ताफा मुशावरात चौक परिसरातून जात असताना एका महिलेने थेट रस्त्यावर कचरा आणून टाकला. हा प्रकार पाहताच विसपुते यांनी तातडीने गाडी थांबवून त्या महिलेला जाब विचारला. विशेष म्हणजे, तेथील एका शाळेच्या भिंतीवर ‘येथे कचरा टाकू नये अन्यथा दंडात्मक कारवाई होईल’ असा स्पष्ट इशारा देणारा फलक लावलेला होता. तरीही ‘सर्वच लोक येथे कचरा टाकतात, म्हणून मी टाकला’, असे बेधडक उत्तर त्या महिलेने दिले. यानंतर विसपुते यांनी कत्तलखान्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या संवेदनशील अशा कमालपुरा भागाची पाहणी केली. उघड्यावरील मांस, जमिनीवरील रक्ताळलेले डाग आणि तेथील एकूणच अस्वच्छतेचे भीषण साम्राज्य पाहून त्या संबंधित व्यावसायिकांवर चांगल्याच भडकल्या. अवैध कत्तलखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने हे अवैध धंदे अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ताकीद त्यांनी दिली. तसेच शहरातील अस्वच्छतेला केवळ महापालिकेला जबाबदार धरून चालणार नाही, तर नागरिकांनीही आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून स्वच्छतेचे भान बाळगले पाहिजे. नागरिकांनी कचरा घंटागाडीत टाकावा,असे आवाहन करत रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल,असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कुठे आहेत सुरक्षा साधने?
या पाहणीच्या वेळी नागरिकांकडून अस्वच्छतेबद्दल तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. तसेच या वेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे गमबूट,हातमोजे,मास्क, जॅकेट, चष्मा इत्यादी आवश्यक सुरक्षा साधने आढळून आली नाहीत. त्यामुळे विसपुते यांनी संबंधित मक्तेदारास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचेही आदेश दिले. या दौऱ्याप्रसंगी उपायुक्त सुनिता कुमावत, सहाय्यक आयुक्त अनिल पारखे,जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, प्रमुख स्वच्छता निरीक्षक उमेश सोनवणे, एकबाल जान मोहम्मद आदी अधिकारी उपस्थित होते.
