मालेगाव: ठेकेदाराकडून ८० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, त्यांचे स्वीय सहाय्यक नीलेश पाटील आणि लेखापाल हरीश डिंबर या तिघांना गुरुवारी अटक झाली. मात्र,सेवानिवृत्तीला काही तास उरले असतानाच अटक झालेल्या आयुक्तांचे नाव एका रस्त्याला देऊन ‘गौरव’ करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मनसुबा होता, ही बाब समोर आल्यावर शहरात टिकेची प्रचंड झोड उठवली जात आहे.
गुरुवारी महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. नंतर ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. मात्र,सभा सुरू होण्याच्या बेतात असतानाच संपूर्ण शहराला हादरवणारे लाच प्रकरणाचे नाट्य घडले. या सभेत शहरातील विविध रस्ते व चौकांच्या नामकरणाचा एक विषय कार्यक्रम पत्रिकेवर होता. सत्ताधारी इस्लाम पक्षाचे नगरसेवक उद्धव दरेकर यांच्या प्रस्तावानुसार, नवापुरा भागातील मिल्लत मदरसा ते आग्रा रोड या रस्त्याला ‘आयुक्त रवींद्र जाधव मार्ग’ असे नाव देण्याचा एक ठराव चर्चेला येणार होता.
मात्र, सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच एसीबीच्या पथकाने आयुक्तांसह तिघांना ताब्यात घेतले. त्यामुळे ज्या अधिकाऱ्याच्या नावाचा फलक रस्त्यावर लावण्याची तयारी सुरू होती, तोच अधिकारी लाचेच्या विळख्यात अडकल्याचे समोर येताच शहरात तीव्र संताप उसळला. ‘भ्रष्ट अधिकाऱ्यांचे असे उदात्तीकरण कशासाठी?’असा सवाल करत नागरिकांनी समाजमाध्यमांवर प्रशासनाचा पंचनामा केला. सभेसाठी आलेल्या ‘एमआयएम’ पक्षाच्या नगरसेवकांनी हातात फलक झळकावून जोरदार घोषणाबाजी करत याबद्दल निषेध नोंदवला.
टक्केवारी भोवली
एका ठेकेदाराने पूर्ण केलेल्या दोन विकासकामांची बिले काढून ती बँक खात्यावर आरटीजीएस करण्यासाठी प्रत्येकी ४ टक्क्यांप्रमाणे ८० हजारांची मागणी झाली होती. पडताळणीदरम्यान स्वीय सहाय्यक पाटील व लेखापाल डिंबर यांनी लाच मागून प्रोत्साहन दिल्याचे, तर आयुक्त जाधव यांनी रक्कम खात्यात जमा झाल्यावर ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे एसीबीच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी तिघांविरोधात किल्ला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. जाधव हे ३१ ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावरच आयुक्तांवर ही कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात प्रचंड हादरा बसला आहे. न्यायालयाने तिघांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
