मालेगाव: मालेगाव महानगरपालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी मोठी कारवाई करत खळबळ उडवून दिली आहे. कामांची बिले मंजूर करून देण्यासाठी तब्बल ८० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, त्यांचे स्वीय सहाय्यक नीलेश पाटील आणि लेखापाल हरिश डिंबर या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका ४८ वर्षीय तक्रारदाराने तक्रार नोंदवली होती. तक्रारदाराने पूर्ण केलेल्या दोन कामांची बिले मंजूर करून त्यांचे पैसे ठेकेदारांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे जमा करण्यासाठी, प्रत्येकी ४ टक्के याप्रमाणे एकूण ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारीनंतर पडताळणी केली असता, १० जुलै २०२६ आणि १३ जुलै २०२६ रोजी आयुक्त रवींद्र जाधव यांचे स्वीय सहाय्यक निलेश पाटील यांनी ४ टक्के लाचेची थेट मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. तसेच मी आयुक्तांना विचारून सांगतो,असे म्हणत या मागणीला प्रोत्साहन दिले होते. त्यानंतर २४ जुलै २०२६ रोजी स्वतः आयुक्त रवींद्र जाधव यांनी तक्रारदाराकडे बिलांची रक्कम खात्यावर जमा झाल्यानंतर लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. याशिवाय, १५ जुलै २०२६ रोजी महापालिकेचे लेखापाल हरिश डिंबर यांनीही या लाचेच्या मागणीला प्रोत्साहन दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
गुन्हा दाखल अन् तिघेही ताब्यात
लाच मागणीची खात्री पटल्यानंतर २९ ऑक्टोबर २०२६ रोजी मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कारवाई करत पथकाने आयुक्त रवींद्र जाधव, स्वीय सहाय्यक नीलेश पाटील आणि लेखापाल हरिश डिंबर या तिन्ही संशयितांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडताळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक स्वाती पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पथकात स्वप्नील राजपुत,पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार,शरद हेंबाडे, युवराज खांडवी,विनोद पवार,संदीप हांडगे,किरण धुळे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास धुळे एसीबीचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे हे करीत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिका आयुक्तांसह अन्य दोघांवर अटकेची कारवाई केल्याने प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
३१ ऑक्टोबरला होणार होती रिटायरमेंट..
आयुक्त जाधव हे ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होणार होते. तत्पूर्वीच त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई झाली आहे. अटकेनंतर संशयितांच्या येथील घरांची झडती घेण्यात आली. या झडतीत नेमके काय मिळाले, याची माहिती अद्याप प्राप्त होऊ शकली नाही. अटकेनंतर तिघांना न्यायालयात उभे करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
