​मालेगाव: कामांची प्रलंबित बिले मंजूर करून ती बँक खात्यात वर्ग करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले मालेगाव महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त रवींद्र जाधव, त्यांचे स्वीय सहाय्यक नीलेश पाटील आणि लेखापाल हरिश डिंबर या तिघा संशयितांना येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला असून, न्यायालयाच्या या निर्णयामुळे तिन्ही संशयितांना मोठा दिलासा मिळाला आहे.

​ २० लाखांच्या बिलांसाठी टक्केवारीची मागणी

एका स्थानिक ठेकेदाराने महापालिका हद्दीत पूर्ण केलेल्या दोन वेगवेगळ्या कामांची सुमारे २० लाख रुपयांची बिले प्रशासनाकडे प्रलंबित होती. ही बिले मंजूर करून संबंधित रक्कम आरटीजीएसद्वारे बँक खात्यात वर्ग करण्यासाठी प्रत्येकी ४ टक्के याप्रमाणे एकूण ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार होती. वारंवार पाठपुरावा करूनही अडवणूक होत असल्याने संबंधित तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवली होती. एसीबीच्या पथकाने केलेल्या गोपनीय पडताळणी दरम्यान तत्कालीन आयुक्त, स्वीय सहाय्यक आणि लेखापाल या तिघांनीही लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला होता.

​ तपास आणि न्यायालयीन घडामोडी

​या प्रकरणात प्रत्यक्षात लाचेची रक्कम स्वीकारली गेली नसली, तरी लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने एसीबीने येथील किल्ला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर तत्काळ कारवाई करत गेल्या गुरुवारी तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली. अटकेनंतर प्रारंभी न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर संशयितांच्या वतीने येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. सुनावणी दरम्यान अर्जदारांच्या वतीने ॲड. ए. वाय. वासिफ यांनी कायदेशीर बाजू मांडत जोरदार युक्तिवाद केला. तर दुसरीकडे मूळ तक्रारदाराच्या वतीने ॲड. सचिन निकम यांनी संशयितांच्या जामिनाला तीव्र विरोध नोंदवला.

​ संशयितांना मोठा दिलासा

दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायमूर्ती एम.ए.भोसले यांनी तिघांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र,हा जामीन मंजूर करताना आठवड्यातून तीन दिवस किल्ला पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे बंधनही न्यायालयाने संशयितांना घालून दिले आहे. मालेगाव महापालिकेच्या इतिहासात प्रथमच थेट आयुक्तांवर लाचखोरीचा गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झाल्याने स्थानिक प्रशासकीय व राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. आता जामीन मंजूर झाल्याने तिघांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.