मालेगाव : सन २०२६-२७ या वर्षासाठी महापालिकेचे ११११ कोटींचे प्रशासकीय अंदाजपत्रक लेखा विभागाने आयुक्त रवींद्र जाधव यांना सादर केले आहे. कोणतीही करवाढ न करता वर्षभरात ५९९ कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट व ५१२ कोटी शासन अनुदान गृहीत धरून हे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
महापालिका स्वउत्पन्नाला सर्वाधिक २५५ कोटी रुपये शासन जीएसटी अनुदानातून मिळणार आहेत. मालमत्ता कर व पाणीपट्टीतून अनुक्रमे ५३ व ४४ कोटी रुपये गृहीत धरण्यात आले आहेत. संकीर्ण, शैक्षणिक विभाग व अंशदानातून एकूण ११५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.
प्रशासकीय अंदाजपत्रक प्रथम आयुक्तांकडून स्थायी समिती सभापतींना सादर केले जाते. मात्र,स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड झालेली असली तरी सभापती निवड प्रलंबित आहे. ही तांत्रिक अडचण लक्षात घेता आयुक्तांकडून महापौरांकडे हे अंदाजपत्रक दिले जाईल. स्थायी सभापतींचे अधिकार महापौरांना आहेत, असे गृहीत धरून ही प्रक्रिया पूर्ण होईल,असे आयुक्त रविंद्र जाधव यांनी नमूद केले आहे. मार्च अखेरपूर्वी स्थायी समिती सभापतींची निवड झाल्यास सभापतींकडून महापालिका सभागृहास हे अंदाजपत्रक सादर केले जाईल. अन्यथा महापौरांकडूनच विशेष महासभेत हे अंदाजपत्रक सादर करुन त्याला अंतिम मंजुरी घेतली जाईल.
मुख्य लेखा अधिकारी गजानन पाटील, कर उपायुक्त हेमलता डगळे, मुख्य लेखा परीक्षक शाबाना शाह, लेखाअधिकारी हरीश डिंबर, हाफिज अन्सारी, शैलेश पाटील आदींनी आयुक्त रवींद्र जाधव यांना हे अंदाजपत्रक सादर केले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रोहिदास दोरकुळकर हे उपस्थित होते. आयुक्तांकडून या अंदाजपत्रकाचे अवलोकन केल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
असा जमा होणार पैसा (रक्कम कोटीत)
आरंभीची शिल्लक – २.६४
महसूली उत्पन्न – ५९९.०७
भांडवली उत्पन्न ४३०. ९२
इतर उत्पन्न ७८.७२
असा होणार खर्च (रक्कम कोटीत)
महसुली खर्च – ५९७.६१
भांडवली खर्च – ४३०.०४
इतर खर्च – ८३. २८
अखेरची शिल्लक – ०.४२
