शंभर कोटीची वाढ; ‘स्थायी’कडून मंजुरी

मालेगाव: मालेगाव महापालिकेचे ५८४ कोटी ५९ लाख १० हजार ८८ रुपयांचे आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी सादर केलेले अंदाजपत्रक किरकोळ दुरुस्तीनंतर स्थायी समितीने मंजूर केले. गेल्या वर्षांच्या तुलनेत शंभर कोटीहून अधिक रक्कमेची वाढ या अंदाजपत्रकात सुचविण्यात आली असून नव्या घरांवर आकारलेला मालमत्ता कर वगळता शहरवासीयांवर कुठलीही कर वाढ न लादण्याची खबरदारी या अंदाजपत्रकात घेण्यात आली आहे. 

महापालिकेच्या परिषद सभागृहात आभासी पद्धतीने सभापती जफर अहमद अहमदुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी प्रशासनातर्फे वार्षिक अंदाजपत्रक समितीकडे सादर केले. मुख्य लेखापरीक्षक तथा उपायुक्त राजू खैरनार, सहाय्यक आयुक्त हेमलता डगळे, सचिन महाले, सुनील खडके, नगरसचिव श्याम बुरकूल आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. सदस्यांनी अंदाजपत्रकाच्या जमा-खर्च बाजुंचा अभ्यास आणि दुरुस्तीसाठी एक तास सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यानुसार तासाभरानंतर तहकूब सभा घेण्यात आली. या सभेत स्थायीने किरकोळ दुरुस्त्या सुचवत अंदाजपत्रक मंजूर केले. मागील दोन वर्षे करोना संकटाला तोंड देताना महापालिकेची बरीच दमछाक झाली.

या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या या अंदाजपत्रकात आरोग्य आणि औषधांच्या खर्चावरील तरतूद दुप्पट अर्थात तीन कोटी करण्यात आली आहे. आगामी काळात शहरात सिमेंटचे रस्ते करण्यावर भर दिला जाणार असून या रस्त्यांच्या कामांसाठी सहा कोटी, पंतप्रधान आवास योजनेसाठी पाच कोटी, मोसम नदी सुधारणा आणि संवर्धनासाठी २० कोटी, स्वच्छता यंत्र व घनकचरा व्यवस्थापनसाठी २५ कोटी, शहराला २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी १० कोटी, पालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी पाच कोटी अशी तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. 

शंभर कोटींची विक्रमी वाढ

शंभर कोटीची होणारी विक्रमी वाढ हे या अंदाजपत्रकाचे वैशिष्टय़े असून शासनाकडून भांडवली कामांसाठी मिळणारे ५० कोटीचे अनुदान तसेच घरपट्टी सर्वेक्षणानंतर मालमत्ता करात ४० कोटी आणि विकास शुल्कासह अन्य उत्पन्नातून १३ कोटींची वाढ गृहीत धरल्याने अंदाजपत्रकाच्या रकमेत वाढ झाल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. स्थायी समितीच्या याच सभेत शिक्षण मंडळाच्या अंदाजपत्रकालाही मंजुरी देण्यात आली आहे. सभेतील चर्चेत सखाराम घोडके, अस्लम अन्सारी, डॉ. खालीद परवेज आदींनी भाग घेतला. स्थायी समितीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकावर  महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होईल. त्यानंतर अंतिम मंजुरीवर शिक्कामोर्तब होणार आहे.