​मालेगाव : महापालिकेच्या विद्युत अधीक्षकांच्या दालनात झालेल्या नमाज पठणाचे येथे तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकाराच्या विरोधात बुधवारी सायंकाळी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत थेट महापालिका आयुक्तांच्या दालनात ‘हनुमान चालीसा’ पठण करत उत्तर दिले आहे. या पवित्र्यामुळे महापालिका प्रशासनाची मोठी कोंडी झाली असून या विषयावरून शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

‘लोक संघर्ष समिती’ या संघटनेने शहरातील पथदीप बंद असल्याबद्दल महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संताप आहे. याच संदर्भात समितीचे लुकमान कमाल आणि काही नागरिक गेल्या सोमवारी महापालिकेत दाखल झाले.

तिथे विद्युत विभागाच्या अधीक्षकांना भेटण्यासाठी ते त्यांच्या कार्यालयात गेले. ​यावेळी विद्युत अधीक्षक बैठकीसाठी बाहेर गेल्याने भेटीसाठी आलेले नागरिक त्यांच्या दालनातच थांबले. बराच वेळ प्रतीक्षा करूनही विद्युत अधीक्षक दालनात परतले नाहीत. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नमाजाची वेळ झाली. सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने, बराच वेळ वाट पाहूनही अधिकारी न आल्याने उपस्थित नागरिकांनी थेट अधीक्षकांच्या दालनातच सामूहिक नमाज पठण सुरू केले. या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शहरात चांगलीच खळबळ उडाली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. महानगरपालिका ही शासकीय वास्तू आहे. अशा ठिकाणी धार्मिक कृत्ये करणे अयोग्य आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी सोमय्या यांनी महापालिका आयुक्त रवींद्र जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग संधू यांच्याकडे केली. तसेच ​सोमय्या यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शासकीय कार्यालयात नमाज पठणाच्या या प्रकाराविरोधात भाजप तसेच हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्याचे चित्र आहे. या नमाज पठणाला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी सायंकाळी शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने महापालिकेत एकवटले. त्यांनी आयुक्तांच्या दालनात ठाण मांडून सामूहिकरीत्या हनुमान चालीसाचे पठण केले. तसेच जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.​ हनुमान चालीसा पठणानंतर कार्यकर्त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोहिदास दोरकुळकर यांना निवेदन दिले. शासकीय कार्यालयाचा वापर धार्मिक कृत्यांसाठी करणाऱ्यांवर कठोर कारवाई, अशी मागणी यावेळी करण्यात आली.