​मालेगाव : शहरात सध्या समस्यांचा डोंगर आणि राजकीय वादाचे मोहोळ निर्माण झाल्याचे पदोपदी दिसत आहे. अशातच आता पथदीपांची तक्रार घेऊन महापालिकेत गेलेल्या संतप्त कार्यकर्त्यांनी थेट विद्युत अधीक्षकांच्या दालनातच नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावर तीव्र आक्षेप घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

​मालेगावातील ‘लोक संघर्ष समिती’ या संघटनेने शहरातील बंद पथदीपांबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संताप आहे. याच संदर्भात समितीचे लुकमान कमाल आणि काही नागरिक गेल्या सोमवारी महापालिकेत गेले. तिथे विद्युत विभागाच्या अधीक्षकांना भेटण्यासाठी ते त्यांच्या कार्यालयात गेले. ​

अधीक्षक बैठकीसाठी बाहेर गेल्याने नागरिक त्यांच्या दालनातच थांबले. बराच वेळ प्रतीक्षा करूनही विद्युत अधीक्षक दालनात परतले नाहीत. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नमाजाची वेळ झाली. सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने, बराच वेळ वाट पाहूनही अधिकारी न आल्याने उपस्थित नागरिकांनी थेट अधीक्षकांच्या रिकाम्या दालनातच नमाज पठण सुरू केले. या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला, ज्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

भाजपने ते किरीट सोमय्या हे मंगळवारी मालेगाव दौऱ्यावर होते. मालेगाव येथे उघडकीस आलेल्या जन्मदाखल्यांच्या ‘कथित’ घोटाळ्याप्रकरणी अधिकाऱ्यांची चर्चा केल्यावर ते मुंबईत परतले न परतले तोच नमाज पठणाचा हा प्रकार त्यांच्या कानावर पडला. सोमय्या यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. महानगरपालिका ही सार्वजनिक शासकीय वास्तू आहे. अशा ठिकाणी धार्मिक कृत्ये करणे अयोग्य आहे. या प्रकरणी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करावे,अशी मागणी सोमय्या यांनी महापालिका आयुक्त रवींद्र जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग संधू यांच्याकडे केली आहे. तसेच ​सोमय्या यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, शासकीय कार्यालयात अशा प्रकारे नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

​एकीकडे नागरी सुविधांच्या अभावामुळे जनता आक्रमक आहे, तर दुसरीकडे या धार्मिक वादामुळे प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. पथदीपांचा प्रश्न सुटण्याऐवजी आता या नवीन वादाने मालेगावचे राजकारण तापले आहे. पोलीस आणि महापालिका प्रशासन आता यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकाराच्या विरोधात भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.