मालेगाव : शहराच्या विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांविरुद्ध मालेगाव महानगरपालिकेने कंबर कसली आहे. महापौर नसरीन बानो शेख आणि आयुक्त रवींद्र जाधव यांच्या आदेशानुसार,१ एप्रिल रोजी शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला प्रारंभ झाला आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जुना आग्रा मार्गावरील जवळपास ४०० कच्च्या व पक्क्या स्वरूपाच्या अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर फिरला. यामुळे या मार्गावरील शिवतीर्थ ते ममता डेअरीपर्यंतच्या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
बुधवारी सकाळी जुना आग्रा रस्त्यावरील ‘शिवतीर्थ’ पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणांचा विळखा घट्ट बसल्याने हा रस्ता अरुंद झाला होता. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. वाहतुकीला होणाऱ्या अडथळ्यांमुळे या रस्त्यावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत होत्या. यामुळे त्रस्त नागरिकांकडून ही अतिक्रमणे काढण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
महापौर,उपमहापौरांची कडक भूमिका
महापालिकेत प्रशासकराज संपुष्टात आल्यानंतर नसरीन बानो शेख या महापौरपदी व शान-ए-हिंद या उपमहापौरपदी विराजमान झाल्या. सत्तेवर येताच महापौर व उपमहापौर यांनी शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली. त्यानुसार १ एप्रिलपासून शहरात धडक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याचे निश्चित केले गेले होते. त्यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. पहिल्या दिवसाच्या कारवाईत ४०० पेक्षा अधिक छोटी-मोठी दुकाने, शेड आणि ओटे तोडण्यात आले. ही अतिक्रमणे काढताना साहित्य देखील जप्त करण्यात आले.
तगडा पोलीस बंदोबस्त
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महापालिका प्रशासन रस्त्यावर उतरले होते. उपायुक्त डॉ. सुनीता कुमावत, सहाय्यक आयुक्त बाळू धोंडगे आणि अतिक्रमण अधीक्षक भरत सावकार हे यावेळी जातीने हजर होते. प्रभाग अधिकारी शाम बुरकुल, मोहम्मद इरफान, संतोष गायकवाड, सहाय्यक नगररचनाकार गणेश माळी, बांधकाम आणि विद्युत विभागाचे अधीक्षक संतोष अहिरे आदींनी या कारवाईत भाग घेतला. या मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. किरकोळ अपवाद वगळता ही मोहीम कुठल्याही अडथळ्याविना पार पडली.
अन्यथा होणार कारवाई!
शहराचा विकास, सुशोभीकरण व वाहतुकीला होणारा अडथळा दूर करण्यासाठी शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमणे केली आहेत, त्यांनी ती स्वतःहून काढून घ्यावीत आणि प्रशासकीय कारवाईत होणारे आर्थिक नुकसान टाळावे,असे आवाहन महापौर नसरीन बानो शेख व आयुक्त रवींद्र जाधव यांनी केले आहे. या कारवाईमुळे रस्ते मोकळे श्वास घेणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
