​मालेगाव: मालेगाव महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी इस्लाम पार्टी व समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंट या आघाडीला दिलेले समर्थन काँग्रेससाठी फळाला आले आहे. सत्ताधारी आघाडीने महापालिकेतील आर्थिक तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला दिले असून मंगळवारी एजाज बेग यांची या पदी बिनविरोध निवड झाली आहे.

८४ सदस्य संख्या असलेल्या मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्या ‘सेक्युलर फ्रंट’ला ४० जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ४३ या जादुई आकड्यासाठी त्यांना केवळ तीन जागांची गरज होती. या परिस्थितीत निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी, तीन जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने या आघाडीला पाठिंबा जाहीर केला.

काँग्रेसच्या या निर्णायक पाठिंब्यामुळेच सेक्युलर फ्रंटचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला होता. निकाल जाहीर झाल्यावर काही तासात काँग्रेस सेक्युलर फ्रंटच्या तंबूत गेल्याने लाख प्रयत्न करूनही विरोधी एमआयएम व शिवसेना गटाला सत्तेचे गणित जुळवणे अशक्यप्राय झाले होते. त्यामुळे महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक एकतर्फी झाली होती. इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो खालीद शेख यांची महापौरपदी तर, समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद यांची उपमहापौरपदी निवड झाली.

सत्ताधारी गटाचा वरचष्मा

काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या पाठिंबामुळे सेक्युलर फ्रंटचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर झाल्याने काँग्रेसला स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याचा शब्द आघाडीतर्फे देण्यात आला होता. स्थायी समितीमध्ये सत्ताधारी इस्लाम पक्षाचे सर्वाधिक सात सदस्य असून एमआयएमचे चार व शिवसेना शिंदे गटाचे तीन सदस्य आहेत. इस्लाम पक्षाचे मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पार्टी व काँग्रेसचा प्रत्येकी एका सदस्याचा या समितीत समावेश आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाकडे १६ पैकी ९ सदस्यांचे या समितीत बहुमत आहे.

एजाज बेग यांचा एकमेव अर्ज

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी विहित मुदतीत काँग्रेसचे एजाज बेग यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. मंगळवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षपदाच्या निवडीसाठी स्थायी समिती सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. बेग यांचा एकमेव अर्ज असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

या निवडीनंतर काँग्रेस कार्यकर्ते व एजाज बेग समर्थकांनी एकच जल्लोष केला. या सभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. या पदासाठी देखील इस्लाम पक्षाच्या ताहेरा शेख यांचा एकमेव अर्ज असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

एकूण ९ सदस्य असलेल्या महिला व बालकल्याण समितीत इस्लाम पक्षाचे चार, एमआयएम व शिवसेना शिंदे गटाचे प्रत्येकी दोन व समाजवादी पार्टीच्या एका सदस्याचा समावेश आहे. या सभेप्रसंगी आयुक्त रवींद्र जाधव,नगरसचिव आदी साजिद अहमद आदी अधिकारी उपस्थित होते.