मालेगाव: मालेगाव महानगरपालिकेच्या गुरुवारी पार पडलेल्या विशेष महासभेत महत्त्वाच्या अशा स्थायी समिती सदस्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. स्थायी समितीत सत्ताधारी गटाचाच वरचष्मा राहिला आहे. याच सभेत महिला व बालकल्याण समिती सदस्यांची तसेच सभागृहनेत्याची निवड करण्यात आली.

स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समिती सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महापौर नसरीन बानो खालिद शेख यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त रवींद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष महासभा पार पडली. ​महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ३१ (अ) नुसार, महापौरांनी सभागृहात दोन्ही समित्यांच्या सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये विविध राजकीय पक्षांना त्यांच्या संख्याबळानुसार प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. संबंधित पक्षाच्या गटनेत्यांनी संख्याबळानुसार सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात दिल्यावर महापौरांनी ती अधिकृतरित्या जाहीर केली.

महानगरपालिकेची ‘तिजोरी’ मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीत एकूण १६ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यात सत्ताधारी इस्लाम पक्षाचे सर्वाधिक ७ सदस्य असून, एमआयएमचे ४, शिवसेना शिंदे गटाचे ३ सदस्य यांनीही आपले स्थान पक्के केले आहे. इस्लाम पक्षाचे मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पार्टी व काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्याचा स्थायी समितीत समावेश झाला आहे.

​​इस्लाम पक्षाचे करनसेन चव्हाण, सगीरूद्दीन नजीरूद्यीन,यास्मिन फारूक खान, शगुफ्ता शकील अहमद, सुगराबी नबी शाह, अन्सारी मोहम्मद असलम खलील अहमद, शेख रफीक शेख अफजल, ​एमआयएमचे रिजवाना सोहैल अहमद, शेख सिकंदर शेख शब्बीर, सादीया लईक अहमद, खालीद परवेज मोहम्मद युनुस, ​शिवसेना शिंदे गटाचे निलेश काकडे, नरेंद्र सोनवणे व आशा अहिरे, ​समाजवादी पक्षाचे मोहंमद मुस्तकीम मोहम्मद मुस्तफा व ​काँग्रेसचे एजाज बेग अजीज बेग या सदस्यांचा स्थायी समितीत समावेश झाला आहे.

महिला व बालकल्याण समिती

महिला आणि बालकांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या महिला व बालकल्याण समितीच्या ९ सदस्यांची देखील घोषणा यावेळी करण्यात आली. या समितीत इस्लाम पक्षाच्या सलमाबानो शफीक अहमद,शेख जाबीद शेख अनीस,शेख ताहेरा शेख रशीद,मेहमुदा बानो अब्दुल कादीर या चार सदस्यांचा समावेश झाला आहे. एमआयएमतर्फे रिजवानाबी शेख सलीम व रिजवानाबी रजिया शाहीद अहमद, शिवसेनेतर्फे राजश्री पाटील व हर्षिता लाडके, समाजवादी पार्टीतर्फे रुखसाना नुर मोहम्मद यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी सभागृहनेते म्हणून इस्लाम पार्टीचे निहाल अहमद सुलेमान अहमद यांची निवड करण्यात आली आहे.​ फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात महापौर व उपमहापौर पदांची निवड झाल्यानंतर स्थायी तसेच महिला व बालकल्याण या समित्यांच्या निवडीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता या समित्यांचे सदस्य आपापल्या सभापतींची निवड करतील, ज्याकडे संपूर्ण मालेगाव शहराचे लक्ष लागून आहे. या निवडीमुळे महापालिकेतील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून, विकासकामांना आता खऱ्या अर्थाने गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.