मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेतील सत्ता समीकरणे आता अत्यंत रंजक वळणावर जात असल्याचे दिसत आहे. सर्वाधिक ३५ जागा मिळवणाऱ्या इस्लाम पक्ष आणि समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटला काँग्रेसने पाठिंबा दिल्याने सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत असतानाच, एमआयएमचे नेते आणि आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘मेयर का गेम लंबा होता है, पर्दे के पीछे कुछ भी हो सकता है,’ असे म्हणत आगामी काळात मोठा उलटफेर होऊ शकतो असे संकेत मौलाना यांनी दिले आहेत. त्यामुळे इस्लामला सत्तेपासून रोखण्यासाठी मौलाना मुक्ती हे काहीतरी खेळी करण्याच्या तयारीत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
८४ जागांच्या मालेगाव महापालिकेत बहुमतासाठी ४३ आकड्याची गरज आहे. इस्लाम पक्षाकडे स्वतःचे ३५ आणि समाजवादी पार्टीचे ५ असे एकूण ४० सदस्य आहेत. काँग्रेसच्या ३ सदस्यांनी पाठिंबा दिल्याने हा आकडा ४३ वर पोहोचला आहे. त्यातच भाजपचे २ सदस्यही या आघाडीला साथ देण्याची शक्यता असल्याने इस्लाम पक्षाचा महापौर बसणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या आक्रमक पवित्र्याने इस्लाम पक्षाच्या मनसुब्यांवर पाणी फेरले जाते की,काय अशी शंका उपस्थित होत आहे.
’आम्ही काही वेठबिगार नाही!’
२१ जागा मिळविणाऱ्या एमआयएम पक्षाने आम्हाला विनाशर्त पाठिंबा द्यावा, असे आवाहन इस्लाम पक्षाचे संस्थापक माजी आमदार आसिफ शेख यांनी केले होते. मात्र मौलाना मुफ्ती यांनी त्यास आक्षेप घेत आम्ही वेठबिगार आहोत का, असा सवाल उपस्थित केला आहे. सत्ता आल्यावर तुम्ही शहराचा काय विकास करणार आहात हे आधी सांगा, पाठिंबा दिल्यास एमआयएमच्या २१ सदस्यांच्या प्रभागांमध्ये कोणती कामे करणार आहात त्याचाही शब्द आधी द्यावा, तरच तुम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेता येईल, अशी भूमिका मौलाना यांनी मांडली. लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रभागात काय कामे होणार, याचा शब्द घेतल्याशिवाय आम्ही पाठिंबा कसा देणार, असा प्रश्न उपस्थित करत २१ सदस्य असूनही आम्हाला किंमत न देता आमचा अपमान करण्याचा प्रयत्न सेक्युलर फ्रंटकडून होत आहे, असा आरोप मौलाना यांनी केला आहे.
‘हे तर इस्लाम पक्षाचे ‘षडयंत्र’
मौलाना मुफ्ती यांनी इस्लाम पक्षावर गंभीर आरोप केला आहे. विनाशर्त कुणीच पाठिंबा देणार नाही, हे माहित असतानाही तसा पाठिंबा मागण्यामागे इस्लाम पक्षाचे एक षडयंत्र आहे. एमआयएमने पाठिंबा दिला नाही, असे चित्र निर्माण करून जातीयवादी पक्षांची मदत घेण्याचे इस्लाम पक्षाचे मनसुबे होते, असे ते म्हणाले. एमआयएमला डावलून तीन सदस्य असलेल्या काँग्रेसला जास्त महत्त्व दिले जात असल्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले.
गेम’ अजून बाकी आहे!
येत्या ७ फेब्रुवारीला महापौरपदाची निवडणूक होत आहे. निवडणुकीला अजून नऊ दिवस बाकी असून या काळात ‘बात बनणे आणि बिघडणे’ याला वेळ लागणार नाही, असा इशारा मौलानांनी दिला आहे. तसेच ‘पळणारे किती पळतात, ते केव्हा थकतात आणि कुठे बसतात याकडे आमचे लक्ष आहे. त्यानंतर आम्ही आमचा गेम सुरू करू’ या त्यांच्या वाक्यामुळे पडद्यामागे काहीतरी शिजत आहे,अशी शंका उपस्थित होत आहे.

