मालेगाव: तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील रविवारच्या आठवडे बाजारातील भेळ-भत्ता खाल्ल्याने तब्बल १३७ जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. बाधित रुग्णांमध्ये ३० लहान मुलांचा समावेश आहे. यातील एका चार वर्षांच्या बालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी संबंधित भत्ता विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे.
रात्री खाल्ला भत्ता, सकाळी त्रास
नांदगाव बुद्रुक येथे रविवारी आठवडे बाजार भरला होता. परिसरातील नागरिकांनी बाजारातील एका विक्रेत्याकडून भेळ-भत्ता खरेदी केला होता. घरी गेल्यानंतर रात्री हा भत्ता खाल्ला असता सोमवारी (दि. २८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि तीव्र तापाचा त्रास सुरू झाला. एकापाठोपाठ अनेकांना त्रास होऊ लागल्याने नांदगाव बुद्रुक, डोंगरगाव, चिंचावड, आनंदवाडी आणि आघार या पाच गावांतील ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली.
विक्रेत्याला अटक,नमुने तपासणीसाठी…
सुरुवातीला या रुग्णांवर स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आले. त्यांनंतर रुग्ण संख्या वाढत असल्याची बाब समोर आल्यावर आरोग्य यंत्रणा तात्काळ ॲक्शन मोडवर आली. सर्व रुग्णांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी तालुका पोलिसांनी भत्ता विक्रेता हिला बाबूलाल मोरे (रा.पाटणे) याला ताब्यात घेतले असून भत्त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक
विषबाधा झालेल्यांमध्ये गुरु सागर कुवर (वय ४) या बालकाची प्रकृती खालावल्याने त्याला तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे विशेष पथक त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. इतर सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रल्हाद गुठे आणि डॉ. ए. ए. मोमीन यांनी सांगितले.
मंत्री दादा भुसे यांची रुग्णालयांना भेट
घटनेचे वृत्त समजताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सामान्य आणि महिला व बाल रुग्णालयात जाऊन बाधितांची तसेच नातेवाईकांची भेट घेतली. रुग्णांना तत्पर आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश त्यांनी डॉक्टरांना दिले.या प्रकरणी चौकशी करण्यात येईल,असे माध्यमांशी बोलताना भुसे यांनी नमूद केले.
बाधित रुग्णांचा तपशील
एकूण बाधित रुग्ण: १३७
महिला विभाग: ५६
बालरुग्ण कक्ष: ३०
पुरुष विभाग: ४३
अपघात विभाग: ०७
अतिदक्षता विभाग: ०१
