मालेगाव: केंद्र शासन पुरस्कृत ‘प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ (पीएम स्वनिधी) योजनेच्या माध्यमातून मालेगाव शहरातील पथविक्रेत्यांना आर्थिक सक्षमीकरणाची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेची मालेगाव महानगरपालिकेतर्फे प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत शहरातील १३ हजार २४१ लाभार्थ्यांना तब्बल १८ कोटी ३८ लक्ष रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी पहिल्या टप्प्यात १५ हजार रुपयांचे विनातारण कर्ज बँकेमार्फत दिले जाते. या कर्जाची नियमित परतफेड केल्यास दुसऱ्या टप्प्यात २५ हजार रुपये आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून ७% व्याज अनुदान (सबसिडी) मिळते, तसेच डिजिटल व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना कॅशबॅकचा लाभही दिला जातो.
मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून आयुक्त रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त पल्लवी शिरसाठ यांच्या नियंत्रणाखाली या योजनेची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. महापालिकेतर्फे आतापर्यंत पहिले कर्ज ९,९३० लाभार्थ्यांना, दुसरे कर्ज २,८१५ लाभार्थ्यांना, तर तिसरे कर्ज ४९६ लाभार्थ्यांना मिळवून देण्यात आले आहे. महापालिकेने केवळ शिफारसपत्र वितरणच केले नाही, तर लाभार्थ्यांना बँक समन्वय, कर्ज मंजुरी मिळून देणे आणि शासकीय योजनेशी जोडण्याचे प्रभावी काम केल्यामुळे अनेक पथविक्रेत्यांना आर्थिक स्थैर्य लाभण्यास मदत झाली आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी महापालिकेतर्फे शहरात एकूण १७ विशेष कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. युनियन बँक,कॅनरा बँक,बँक ऑफ महाराष्ट्र,स्टेट बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ बडोदा या बँकांमध्ये हे मेळावे घेण्यात येत आहेत. ज्या लाभार्थी पथविक्रेत्यांनी कर्जासाठी अर्ज केले आहेत, त्यांना या मेळाव्यांमध्ये कर्ज वाटप केले जाणार आहे. तरी संबंधित लाभार्थ्यांनी त्वरित आपल्या बँकेशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयुक्त रवींद्र जाधव यांनी केले आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी शहर अभियान व्यवस्थापक रोहित कन्नोर, संदीप अगोणे आणि मनपाच्या सर्व समुदाय संघटक परिश्रम घेत आहेत.
