मालेगाव: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मालेगावात मोठी कारवाई करत मोबाईल संच चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळवलेआहे. या कारवाईत सटाणा आणि नाशिक शहरातून चोरीला गेलेले तब्बल २७ लाख ३३ हजार ९६० रुपये किंमतीचे १४० मोबाईल संच हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी तीन आरोपी निष्पन्न झाले असून त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी ​सटाणा येथील दुकानातून मोबाईल चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच गेल्या १० जानेवारीच्या रात्री नाशिकच्या मुंबई मुंबई नाका भागातील एका कुरियर कंपनीच्या गोदामाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी नवेकोरे मोबाईल संच ठेवलेले तेथील एक बॉक्स लंपास केले होते. या दोन्ही घटनांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून तपास सुरू होता.

समांतर तपासात यश

सटाणा येथील मोबाईल चोरी घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास सुरू होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना गोपनीय माहिती मिळाली की, सटाणा येथील मोबाईल संच चोरीतील संशयीत हे मालेगाव येथे आले असून नाशिकला जाण्यासाठी ते मनमाड चौफुली भागात थांबले आहेत. त्यानुसार पथकाने तातडीने मनमाड चौफुली भागात धाव घेतली. तेथे पोलिसांनी मुस्तफा अन्सारी (२४) याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईचा अंदाज आल्याने त्याचा एक साथीदार मेहताब अन्सारी याने तत्पूर्वीच धूम ठोकली. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागू शकला नाही. पकडण्यात आलेल्या मुस्तफाची कसून चौकशी केली असता, साथीदाराच्या मदतीने सटाणा येथे मोबाईल चोरी केल्याची तसेच १० जानेवारी २०२६ रोजी नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरातील एक गोदाम फोडून मोबाईल संच चोरल्याची कबुली दिली.

चोरीचे मोबाईल संच घरात

संशयीत ​मुस्तफा अन्सारी याने अधिक तपासात चोरी केलेले मोबाईल संच विक्री करण्यासाठी मालेगावमधील म्हाळदे शिवारात वास्तव्यास असलेल्या मोहम्मद हनिफ याच्याकडे दिल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलीस पथकाने हनिफच्या घरावर धाड टाकली असता, तिथे सटाणा आणि नाशिक येथील गोदामातून चोरी केलेले एकूण १४० मोबाईल संच आढळून आले. पोलिसांनी हे सर्व मोबाईल जप्त केले आहेत. याप्रकरणी मुस्तफा अन्सारी व मोहम्मद हनीफ या दोघांना अटक करण्यात आली आहे. फरार असलेला संशयीत मेहताब अन्सारी याचा पोलीस शोध घेत आहेत.

कुणी केली कारवाई ?

नाशिक जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील व मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. या पथकात उपनिरीक्षक दत्ता कांभिरे,हवालदार चेतन संवत्सर, सुभाष चोपडा, सुधाकर बागूल, प्रशांत पाटील, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, योगेश कोळी, विनोद टिळे व दत्तात्रय माळी यांचा समावेश होता. ​