मालेगाव : मालेगाव तालुका पोलिसांनी गेल्या ३० ऑक्टोबर रोजी दहा लाखाच्या बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा परप्रांतीयांना रंगेहात पकडले होते. या नकली चलन रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचे आणि मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये त्याचे नेटवर्क पसरल्याचे समोर आले. तसेच मध्यप्रदेशच्या आरोग्य विभागातील निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक नवलखे हा या धंद्यामागील सुत्रधार असल्याचे आणि नकली नोटांची छपाई करून साथीदारांना पुरवठा करीत असल्याची माहिती तपासात उघड झाली. त्यानंतर या गोरख धंद्यात हा डॉक्टर कसा आला तसेच त्याला ही कल्पना कुठे व कशी सुचली, याबद्दल समोर आलेली माहिती चक्रावून टाकणारी आहे.

दहा लाखांच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी मालेगावात दाखल झालेल्या मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील मौलाना मोहम्मद जुबेर व नाझीर अक्रम अन्सारी या दोघांना पोलिसांनी मुद्देमालासह पकडले होते. त्यानंतर या दोघांकडून निम्म्या किंमतीत या बनावट नोटा घेऊन त्या खपविण्याचे उद्योग करणारा मालेगाव शहरातील तौसिफ अंजुम अन्सारी व चांदवड येथील अमजद शहाबुद्दीन कोतवाल या आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली. पकडण्यात आलेल्या मौलाना मोहम्मद जुबेर मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पेठिया या गावामध्ये एका मशिदीमध्ये इमाम होता.

मालेगाव पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती मिळाल्यावर मध्य प्रदेश पोलिसांनी त्याचे वास्तव्य असलेल्या मदरशामधील खोलीची झडती घेतली. झडतीत ५०० रुपयांच्या १९ लाख ७८ हजाराच्या बनावट नोटा तेथे आढळून आल्या. दरम्यान, या प्रकरणाचा मास्टर माईंड डॉ.प्रतीक नवलखे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. बऱ्हाणपूर येथील जिल्हा रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी असताना त्याच्या विरोधात करोना काळात आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यात त्याला अटक झाली होती. त्याच्यावर निलंबनाची कारवाई देखील झाली. हा डॉक्टरच मौलाना याला बनावट नोटांचा पुरवठा करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या साथीदारांना मालेगाव पोलिसांनी पकडल्याची भणक लागताच तो फरार झाला होता.

दरम्यान, गेल्या २३ नोव्हेंबर रोजी डॉ. नवलखा यास मध्यप्रदेश पोलिसांनी दोघा साथीदारांसह भोपाळ येथून अटक केली. या तिघांकडे देखील बनावट नोटा आढळून आल्या. या तिघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यातील डॉ. नवलखे यास मालेगाव पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांकडून ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयापुढे उभे केले असता त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस तपासात या डॉक्टरबद्दल अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

डॉ.नवलखे,मौलाना जुबेर व नकली चलन टोळीतील अन्य सदस्य वेगळ्या गुन्ह्यांमध्ये खंडवा येथील तुरुंगात बंदिस्त होते. तेथे त्यांची परस्परांशी ओळख झाली. त्यानंतर तुरुंगातून सुटल्यावर २०२२ पासून नकली नोटा छपाई करुन त्या चलनात आणण्याचे उद्योग या टोळीने महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील हस्तकांमार्फत सुरू केले. त्यासाठी भोपाळ येथे ट्रॅव्हल्स एजन्सीचे कार्यालय थाटले. त्याच्या आडून नकली नोटा छपाई व त्या चलनात आणण्याचा त्यांचा उद्योग सुरू होता. अखेर मालेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला व टोळीतील सदस्यांना गजाआड व्हावे लागले.

जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू , उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर व पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार भदाने हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.